Chhatrapati Sambhajiraje : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेतील काही आरोपींना पोलिसांनी अटक केली. पण अद्यापही काही आरोपी फरार आहेत. त्यामुळे फरार आरोपींना अटक करण्याची मागणी करत संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज बीड जिल्ह्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले असून यामध्ये माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हे देखील सहभागी झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना संतप्त सवाल केले आहेत. “वाल्मिक कराडला संरक्षण देणाऱ्या तिथल्या मंत्र्याचा राजीनामा का घेतला नाही?मंत्रिमंडळातून हकालपट्टी का झाली नाही? सरकारने एसआयटी नेमल्यानंतर पुढे काय झालं? या घटनेतील आरोपी कुठे आहेत? आरोपींना पोलीस का पकडू शकत नाहीत?”, असे अनेक संतप्त सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी केले.

हेही वाचा : Manoj Jarange : “मुख्यमंत्री साहेब, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल”, मनोज जरांगेंचा मस्साजोगच्या घटनेवरून देवेंद्र फडणवीसांना इशारा

छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले?

“मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अंत्यत क्रूर पद्धतीने हत्या झाली. महाराष्ट्रामध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. हे मला सांगायलाही लाज वाटते. बीड पॅडर्न हा बिहार सारखं झाला आहे का? हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. १९ दिवस झाले पण अजूनही आरोपींना अटक झालेलं नाही. वाल्मिक कराडही फरार आहे आणि त्याला संरक्षण देणाऱ्या तेथील मंत्र्‍याची अजूनही मंत्रिमंडळातून हकालपट्टी का झाली नाही? त्यांचा अद्याप राजीनामा का घेतला नाही?”, असा संतप्त सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.

“मी याआधीही सांगितलं होतं की, संतोष देशमुखांच्या घटनेत जर न्याय द्यायचा असेल तर वाल्मिक कराडचे जे आश्रयदाते आहेत त्यांना तुम्ही मंत्री करू नका. मात्र, तरीही त्यांना मंत्री केलं. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझी विनंती आहे की तुम्ही या घटनेतील जो खरा आरोपी आहे त्याला अटक करा. तसेच अजित पवार यांनाही मला सांगायचंय की हे तुमच्या पक्षातील मंत्री आहेत. अजित पवार हे नेहमी परखडपणा दाखवतात. पण आता तुम्ही देखील अशा लोकांना का संरक्षण द्यायला लागले? महाराष्ट्रात हे जे चाललंय ते तुम्हाला पटतंय का? उद्या अशा घटना वाढल्या तर हे महाराष्ट्राला परवडणारं आहे का? म्हणून संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, यासाठी आज बीडमध्ये मोर्चा काढला जात आहे. या मोर्चाला जातीय वळण नाही, हा सर्वधर्मीय मोर्चा आहे. आम्ही देखील वाट पाहत आहोत की राज्य सरकार काय कठोर भूमिका घेतंय?”, असंही छत्रपती संभाजीराजे यांनी म्हटलं.

“राजकीय पाठबळ असल्याशिवाय संरक्षण मिळत नाही. मला सांगा स्वत: पंकजा मुंडे यांनी सभेत सांगितलं होतं की, वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडेंचं पानही हलत नाही. आज पंकजा मुंडे या देखील या घटनेबाबत जास्त बोलत नाहीत. मग जे बीडमध्ये चाललंय ते तुम्हा दोघांनाही पटतंय का? कुठेतरी राजकारणाच्या पलिकडे जाऊन विचार केला पाहिजे. ही माणुसकीची हत्या आहे. बीडची गुन्हेगारी पाहून मी देखील चकित झालो. स्वतः धनंजय मुंडे यांच्या हातात बंदूक असलेला एक फोटो मी पाहिला. यामधून तुम्ही जनतेला काय मेसेज देत आहात? या महाराष्ट्रात आपण अशा गोष्टी खपवून घ्यायच्या का? हे आता चालणार नाही. धनंजय मुंडेंना मंत्रिपद देऊ नका हे मी पहिल्या दिवसांपासून सांगत आलोय. या प्रकरणात सरकारने एसआयटी नेमल्यानंतर पुढे काय झालं? या घटनेतील आरोपी कुठे आहेत? हे आरोपींना पकडू शकत नाहीत. या घटनेतील सूत्रधार कुठे आहे? धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड कुठं आहे? हे माहिती नसणं हे न पटणारं आहे”, असं म्हणत छत्रपती संभाजीराजे चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati sambhajiraje on santosh deshmukh case beed morcha and cm devendra fadnavis dhananjay munde walmik karad beed politics rno news gkt