संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरुन राज्यात सध्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. संभाजीराजेंनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला. राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीत संभाजीराजे हे अपक्ष म्हणून लढण्यावर ठाम असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान संभाजीराजेंनी फेसबुकवर छत्रपती शिवाजी महारांना वाकून नमस्कार करताना स्वत:चा एक फोटो भावनिक मजकुरासहीत पोस्ट केलाय. तर दुसरीकडे त्यांचे पुत्र शहाजीराजे छत्रपती यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शहाजीराजे छत्रपती सोलापुरात असताना प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वडिलांच्या उमेदवारीवरुन सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं. राजकारणाचा चिंता रोजच्या जीवनात आणणं हे मला पटत नाही असं यावेळी त्यांनी सांगितलं.
“चालू असलेल्या घडामोडींमुळे आमच्या आजुबाजूचे लोक चिंतेत आहेत. राजेंचं काय होणार? राजे काय करणार आहेत? राजे माघार घेणार की काय? पण आमच्या घरात तणावाचे वातावरण नाही. काल रात्रीदेखील मी आणि आई घरात काय साहित्य खरेदी करावे यावर चर्चा करत होतो. आम्ही कोणत्याही प्रकारच्या तणावात नाही. आमचं नेहमीप्रमाणे सगळं सुरु आहे,” असं त्यांनी सांगितलं.
“सगळ्या घडामोडींवरुन संभाजीराजेंबद्दल जनतेच्या मनात किती प्रेम आहे हे लक्षात येतं. पण राजकारणाची चिंता रोजच्या जीवनात आणणं मला पटत नाही. आम्ही जर खूश नसलो तर लोकांसाठी कसं काम करणार,” असं शहाजीराजे छत्रपती म्हणाले.
राज्यसभा निवडणूक; संजय राऊत आणि संजय पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल
मावळ्यांमुळेच राजे होतात या संजय राऊतांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, “बरोबरच आहे, त्यात चुकीचं काही नाही. शिवाजी महाराजांना ताकद कोणी दिली तर मावळ्यांनी दिली. पण मावळ्यांना शिवाजी महाराजांनीच घडवलं. संभाजीराजेंच्या मागी इतक्या संघटना का आहेत? संभाजीराजेंनी मावळ्यांना दिशा दिली आणि त्यांनी ताकद परत दिली. हे एक नातं आहे”.
“महाराष्ट्रातून संभाजीराजेंना, छत्रपती घराण्याला मोठा पाठिंबा मिळत आहे. मागील तीन दिवसातील घडामोडी पाहिल्या तर इतका पाठिंबा कुठून मिळतोय याचं आश्चर्य वाटतं. हे पाहून चांगलं वाटतं आणि यामुळे जबाबदारी वाढते,” असं शहाजीराजेंनी सांगितलं. यावेळी त्यांनी जास्त राजकीय भाष्य करणं टाळलं.