Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फूट उंच पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे हा पुतळा कोसळल्याचा दावा राज्य शासनाने केला असला, तरी या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. नौदल दिनानिमित्त गतवर्षी ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते.
पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालवण येथील कार्यालयात जाऊन मोडतोड केली. परंतु, ‘या पुतळ्याची उभारणी नौदलामार्फत करण्यात आली होती’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ताशी ४५ किमी वेगाने वारे वाहात होते. त्यामुळे पुतळ्याचे नुकसान झाले असून नौदलाचे अधिकारी मंगळवारी पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : पुतळा आताच पडला, पण अनास्थेचे वादळ जुने…
दरम्यान, सार्वजनिक बांधकाममंत्री तसेच सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली, तर नौदलाचे अधिकारी पाहणी करण्यासाठी गोव्याहून निघाले असल्याची माहिती चव्हाण यांनी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. (पान २ वर) (पान १ वरून) छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी गतवर्षीचा नौदल दिन मालवण येथे साजरा करण्यात आला होता. त्यानिमित्तानेच मालवण राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी करण्यात आली होती. १५ फूट उंचीचा चबुतरा आणि २८ फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी येथील रचना होती. अतिशय दिमाखात उभा असलेला हा पुतळा गेल्या आठ महिन्यांत पर्यटकांचे तसेच शिवप्रेमींचे आकर्षण केंद्र बनला होता. मात्र, सोमवारी दुपारी अचानक तो कोसळल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे. पुतळा कोसळल्याचे वृत्त समजताच रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळाची पाहणी करून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. समुद्राच्या पाण्याच्या खारट हवेतील कण जमा होऊन पुतळा कोसळला असावा, असा प्राथमिक अंदाज चव्हाण यांनी व्यक्त केला. मात्र, याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुतळा उभारला त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले. मालवण पोलीस ठाण्यात कंत्राटदार कंपनी आणि पुतळ्याचे वास्तुविशारद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
नौदलामार्फत काम या पुतळ्याची उभारणी कोणी केली, यावरून सोमवारी दिवसभर चर्चा सुरू होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुतळा उभारल्याचा दावा करत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांसह मालवण येथील या विभागाच्या कार्यालयात शिरून मोडतोड केली. मात्र, या पुतळ्याची जबाबदारी नौदलाकडे होती, असा दावा राज्य सरकारने केला आहे. पुतळ्याच्या संपूर्ण कामाची तसेच निगा राखण्याची जबाबदारी नौदलाची असल्याचा दावाही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राज्याचे आराध्य दैवत आणि अस्मिता आहे. पुतळ्याचा आराखडा व उभारणी नौदलाने केली होती. कोणालाही कायदा हातात घेण्याची गरज व अधिकार नाही. पुतळा पुन्हा दिमाखाने आणि अधिक मजबुतीने उभारला जाईल.
एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री