Historian Opinions on Chhatrapati Shivaji Maharaj’s dog Waghya Statue : रायगड ही छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील राजधानी. रायगड किल्ला हा अभेद्य होता आणि छत्रपती शिवराय यांच्या पराक्रमाची साक्ष देत तो आजही उभा आहे. रायगडावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. या ठिकाणी त्यांची समाधी उभारण्यात आली. या समाधी जवळच वाघ्या कुत्र्याची समाधी आहे त्यावरुन वाद निर्माण झाला आहे.
वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन काय वाद निर्माण झाला आहे?
वाघ्या कुत्र्याची समाधी ही कपोलकल्पित आहे. वाघ्या नावाचा कुत्रा असल्याचे कुठलेही संदर्भ इतिहासात नाहीत, पुरावेही नाहीत त्यामुळे ही समाधी तिथून हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी तीन दिवसांपूर्वीच सरकारला पत्र लिहून केली आहे. दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेऊनही यासंदर्भातली त्यांची भूमिका मांडली. मात्र त्यांच्या या भूमिकेला विरोध होतो आहे.
वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यास लक्ष्मण हाकेंचा विरोध
संभाजीराजेंनी जी मागणी केली आहे ती चुकीची आहे. आम्ही वाघ्या कुत्र्याची समाधी हटवू देणार नाही असं धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. संभाजीराजेंनी विशाळगडावर नासधूस केली तशी त्यांना रायगडावरही करायची आहे का? त्यांच्या हेतूबाबत आम्हाला शंका आहे असंही हाके म्हणाले आहेत. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत इतिहासकारांचं काय म्हणणं आहे? हे आपण जाणून घेऊ.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांनी काय म्हटलंय?
“रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे कपोलकल्पित स्मारक आहे, याची इतिहासात कुठलीही नोंद नाही. इतिहासात आणि दस्तावेजमध्ये या वाघ्या कुत्र्याची कुठलीही नोंद नसताना त्या स्मारकाला संरक्षण दिलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संपूर्ण जीवन चरित्रात वाघ्या कुत्र्याची कुठेही नोंद नाही. तसेच, वाघ्या कुत्र्याचं स्मारक करुन छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा काहींचा प्रयत्न होता. राम गणेश गडकरी यांच्या नाटकातून वाघ्या कुत्र्याची निर्मिती झाली” असं इंद्रजीत सावंत यांनी म्हटलं आहे. राजसंन्यास नावाचं नाटक राम गणेश गडकरींनी लिहिलं आहे. ब्राह्मण ब्राह्मणेतर वादाची किनार त्या नाटकाला आहे. तसंच अर्पण पत्रिकेत वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आहे. तिथूनच वाघ्या कुत्र्याची कथा जन्माला आली. पण राजसंन्यास हे नाटक छत्रपती शिवाजी राजांची, शंभू राजांची बदनामी करणारं नाटक आहे. त्या नाटकाची अर्पण पत्रिका रायगडासारख्या ठिकाणी आहे. कुत्र्याची प्रतिमा उंच बसवण्यात आली आहे. तसंच त्या अर्पण पत्रिका तिथे कोरण्यात आली आहे असंही इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं.
इतिहासकार संजीव सोनवणे काय म्हणाले?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हयातीत वाघ्या कुत्र्याचं शिल्प तयार झालं आहे. दक्षिण दिग्विजय मोहिमेवर महाराज जेव्हा गेले तेव्हा भिलवडी येथे एक युद्ध झालं. त्यात देसाई जो होता तो मारला गेला. त्याची पत्नी मल्लाबाई होती तिने युद्ध चालू ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजांना कळलं की आपला सरदार एका महिलेशी युद्ध करतो आहे. त्यांनी त्या सरदाराला मागे यायला सांगितलं ते स्वतः तिथे गेले. मल्लाबाईला तिचं राज्य परत दिलं. तिच्या लहान मुलाला मांडीवर बसवून दूध भात खाऊ घातला. मल्लाबाईंना छत्रपती शिवाजी महाराजांनी सावित्रीबाई हा किताबही दिला. मल्लाबाईंनी या प्रसंगाची आठवण म्हणून अनेक स्मारक शिळा बनवल्या. त्यात घोडा आहे त्यावर शिवाजी महाराज बसले आहेत, मावळा उभा आहे आणि बाजूने एक कुत्रा चालला आहे असं त्या शिल्पात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्राच नव्हता हा दावा या शिल्पामुळे चुकीचा ठरतो. १६८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन झालं १६७८ पर्यंत कुत्रा होता हे स्पष्ट झालं आहे. एखाद्या कुत्र्याची, मांजराची कुणी बखरीत नोंद करत नाही, कागदपत्रांमध्ये नोंद होत नाही. पण ते शिल्प काय सांगतंय? की महाराजांच्या बरोबरीने चालत जाणारा कुत्रा होता. असं संजय सोनावणे यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाले संजय सोनावणे?
जर्मन लोक त्यावेळी होते त्यांनी वाघ्याचा उल्लेख केला आहे. त्याच्या समाधीचा केला आहे. त्याने चितेत उडी घेतल्याचाही उल्लेख केला आहे. हा पुरावा भारतीय माणसाने नाही तर त्रयस्थ माणसाने दिला आहे. चिं. ग. गोगटे यांनी एक पुस्तक लिहिलं आहे त्या पुस्तकाचं नाव महाराष्ट्रातील किल्ले असं आहे. त्या पुस्तकात वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळतो. छत्रपती शिवाजी महाराजांची रिकामी पालखी त्याने पाहिली त्याने जळत्या चितेत उडी घेतली. आपण काही वेळासाठी ही दंतकथा आहे असं समजलं तरीही या पुस्तकात कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख आहे. दोन इतिहासकारांनी भिन्न मतं मांडली आहेत. इंद्रजीत सावंत यांच्या मते ही समाधी कपोलकल्पित आहे. तर संजय सोनावणेंच्या मते समाधी असल्याचे पुरावे आहेत.