Chhatrapati Shivaji Maharaj महाराष्ट्राचं अराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नुकतीच छत्रपती शिवरायांची जयंती पार पडली. यावेळी आग्रा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तसंच अजित पवारांनी जो महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला त्यातही या स्मारकासाठी तरतूद करण्यात आली. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे.

महाराष्ट्र शासनाचा आग्रा येथील स्मारकाबाबत निर्णय जारी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला ३९५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने आग्रा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं होतं की आग्रा शहरात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैद करण्यात आलं होतं ती वास्तू महाराष्ट्र शासनातर्फे अधिकग्रहीत करुन त्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात येईल. यासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येईल. त्यानुसार यासंदर्भातला शासन आदेश अर्थात जीआर लागू करण्यात आला आहे.

इतिहासकार, जाणकारांची मदत घेऊन उभारलं जाणार स्मारक

आग्रा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार, तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी निधी उपलब्धता, जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींकरिता पर्यटन विभागाला जबाबदारी देण्यात आली आहे. या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Shiv Jayanti 2025 Updates
Shiv Jayanti 2025 Updates

आग्रा या ठिकाणी छत्रपती शिवरायांना औरंगजेबाने नजरकैदेत ठेवलं होतं

आग्रा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते, ती जागा-वास्तू महाराष्ट्र शासन या प्रकल्पात अधिग्रहीत करण्याचा निर्णय झाला आहे. औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत ठेवलं होतं. मात्र छत्रपती शिवाजी महाराज हे शंभूराजांसह अत्यंत शिताफीने या ठिकाणाहून निसटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या आपल्या कौशल्याचा वापर केला होता आणि या ठिकाणाहून सुटका करुन घेतली. हा इतिहास आजही अत्यंत अभिमानाने आणि गौरवाने सांगितला जातो. त्यानंतर आता या याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे. या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहास मांडला जाणार आहे. त्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपक्रम संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी राबविण्यात येणार आहेत अशीही माहिती शासनाच्या आदेशात देण्यात आली आहे.

पर्यटकांसाठी आणि इतिहास अभ्यासकांसाठी मार्गदर्शक ठरणार स्मारक

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून रयतेचं राज्य निर्माण केलं. हे राज्य निर्माण करण्यासाठी महाराजांना अनेक कष्टप्रद आव्हानं स्वीकारावी लागली होती. प्रसंगी काही ठिकाणी माघार सुद्धा घेऊन तह करण्यात आले. यापैकीच मिर्झाराजे जयसिंग यांच्यासह १६६५ मध्ये केलेला ‘पुरंदर तह’ हा ऐतिहासिदृष्या महत्त्वाचा मानला गेला. या करारानुसार महाराजांनी अनेक किल्ले मुघलांना परत केले. तसेच या तहानुसार महाराज बाळराजे शंभूराजे आणि काही निवडक मावळ्यांसह मुघर दरबारात उपस्थित राहिले. यावेळी महाराजांचा मुघल दरबाराकडून अवमान झाल्यामुळे महाराज दरबार सोडून गेले. मात्र त्यानंतर मुघलांनी महाराजांना नजरकैदेत ठेवले. महाराज जिथे नजरकैदेत होते, त्या ठिकाणी दरवर्षी अनेक जण भेट देत असतात. मात्र तिथे महाराजांचं स्मारक असावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे ठिकाण पर्यटकांसाठी, इतिहास अभ्यासकांसाठी महत्त्वाचं ठरेल यात शंका नाही.

Story img Loader