सावंतवाडी: छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे त्यांचा १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा. त्याचबरोबर या परिसरात भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी मागणी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंत्री श्री.केसरकर यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांची मुंबई सह्याद्री अतिथीगृह येथे प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भातील विनंतीपत्र तसेच ‘ऊर्जा हिंदुत्वाची’ या शीर्षकाखाली सविस्तर आराखड्यासह प्रस्ताव सादर केला.

हे ही वाचा…छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे प्रकरण : शिल्पकार जयदीप आपटे याला न्यायालयीन कोठडी

मालवण येथे भारतीय नौदलामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. नुकत्याच घडलेल्या दुर्देवी घटनेमध्ये हा पुतळा कोसळला. यामुळे याच ठिकाणी पुन्हा नव्याने १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा, त्याचबरोबर सध्या ३३ गुंठे जागेवर असलेल्या स्मारकाऐवजी लगतच्या परिसराचा विकास करुन तेथे भव्य दिव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी, अशी मागणी श्री.केसरकर यांनी केली आहे.

हे ही वाचा…पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या बंगल्यासमोर गोळीबार

मालवण नगर परिषदेच्या मंजूर सुधारित विकास योजनेनुसार सध्याच्या स्मारकास लागून वाहनतळ, बगिचा आणि पर्यटन सुविधा या करिता आरक्षित आहेत. या जागा एकत्रितरित्या विकसित करुन येथे शिवसृष्टी उभारण्यात यावी. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्यशाली आरमाराच्या इतिहासाचा उलगडा होईल तसेच येथे जेट्टी निर्माण केल्यास शिवसृष्टीस भेट देणाऱ्या शिवप्रेमींना वर्षानुवर्षे स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या मालवण किल्ल्यावर जाण्याची सुविधा निर्माण होईल. ज्यामुळे शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या सामर्थ्यशाली इतिहासाची नव्याने ओळख होऊन ही प्रेरणा राष्ट्र निर्मितीस उपयोगी ठरेल, असेही श्री.केसरकर यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati shivaji maharaj is idol of maharashtra 100 feet tall statue of him should cerected at malvan in sindhudurg district sud 02