Shiv Jayanti 2025 Shivneri Fort Celebration Highlights : १९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवप्रेमी यानिमित्ताने विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करतात. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात, महाराजांच्या गड-किल्ल्यांचं संवर्धन व्हावं यासाठी तरुणपिढीला मार्गदर्शन केलं जातं. अशाप्रकारे हा शिवजयंती उत्सव विविध भागात साजरा केला जातो. याशिवाय स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर सुद्धा विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याठिकाणी शिवप्रेमींसह बरेच मान्यवर शिवजयंतीला उपस्थित असतात. शिवजयंतीनिमीत्त कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित राहाणार आहेत. राज्यासह देशभरातील शिवजयंतीसंबंधी महत्त्वाच्या अपडेट आपण एका क्लिकवर जाणून घेणार आहोत.

Live Updates

Shiv Jayanti 2025  Highlights 19 February 2025 : देशभरातील शिवजयंती उत्सवाच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

14:29 (IST) 19 Feb 2025

रायगडावर पोहोचल्यावर विकी कौशलची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "माझं नेहमीच एक स्वप्न होतं की.."

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज छावा चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकरणारा बॉलिवूड अभिनेता विकी कौशल यांने रायगडावर छत्रपती शिवरायांचे दर्शन घेतले. यावेळी रायगडावर माध्यमांशी बोलताना विकी म्हणाला की, "मी स्वत:ला खूपच भाग्यशाली समजतो की मला येथे येण्याची संधी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. माझं नेहमीच एक स्वप्न होतं की येथे यावं आणि शिवरायांचं दर्शन घेण्याची संधी मिळावी आणि आज आशीर्वाद घेतल्यानंतर खूप चांगलं वाटत आहे".

"मी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारावी हे माझं भाग्य आहे. लोकांचं प्रेम पाहून खूप चांगलं वाटत आहे. आज जे आहे ते सगळं छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आहे. त्यांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा," असेही विकी कौशल यावेळी बोलताना म्हणाला.

संभाजी महाराज यांची जीवन साकारताना छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका काय होती? या प्रश्नाला उत्तर देताना विकी म्हणाला की, "माझ्या मते फक्त छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन साकारण्यात नाही तर देशभरातली प्रत्येक तरुणाचं जीवन साकारण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण त्यावेळी देशातील पहिले रयतेचे राजा होते. ते रयतेसाठी लढले आणि त्यांच्यासाठीच जगले. आजही आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा मिळते. आजही आपण जे सरकार पाहातो त्या सगळ्याची सुरूवात इथून होते".

14:03 (IST) 19 Feb 2025

नाशिकच्या भोंयगाव येथील कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घोड्याच्या पाठिवर साकारलं शिवरायांचे चित्र

चांदवड तालुक्यातील भोयगाव येथील नेमिनाथ कॉलेजमधील विद्यार्थी किरण केदारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनिमित्त भोयगाव येथील शेतकरी जगन गलांडे यांचा शिवा नावाच्या घोड्यावर ॲक्रीलिक रंगाचा वापर करत छत्रपती शिवरायांची प्रतिकृती अवघ्या पाच तासात रेखाटून छत्रपती शिवाजी महाराज यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

13:02 (IST) 19 Feb 2025
अभिनेता विकी कौशल रायगडावर दाखल! शिवरायांना केलं अभिवादन

छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रायगडावर दाखल झाला. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर हे देखील उपस्थित होते.

12:25 (IST) 19 Feb 2025

Shiv Jayanti 2025 : शिवजयंत्तीनिमित्त मुस्लिम मावळ्यांकडून पुण्यातील कोंढव्यात राष्ट्रीय एकात्मतेचं दर्शन

आज पुण्यातील कोंढवा येथे मुस्लिम मावळा फाउंडेशनच्या वतीने सर्वधर्मीय शिवजयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत अतिशय भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली . यामध्ये मुस्लिम समाजातील युवक ,महिला व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन मुस्लिम मावळा फाउंडेशनचे हाजी गफूर पठाण यांनी केले होते.

सर्व धर्मियांना समान न्याय देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मुस्लिम मावळे आहोत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सालाबादप्रमाणे यावर्षीही श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला वंदन करुया आणि त्यांच्या विचारांना उजाळा देऊया .आणि शिवाजी महाराजांची सर्वधर्म समभावाचे विचार समजापर्यंत पोहचवणे गरजेचे असल्याचे मत यावेळी आयोजक मुस्लिम मावळा फाउंडेशन चे हाजी गफूर पठाण यांनी व्यक्त केले .

12:20 (IST) 19 Feb 2025

सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती उत्साहात साजरी

शिवजयंतीच्या निमित्ताने मालवण मधील सिंधुदुर्ग किल्ल्यावर माजी आमदार वैभव नाईक हे शेकडो शिवभक्तांसह शिवराजेश्वर मंदिरात जिरे टोप व पुष्पहार अर्पण करीत नतमस्तक झाले. यावेळी त्यांनी राज्यातील शिवप्रेमींना शुभेच्या दिल्या. ज्या प्रमाणे शिवरायांनी सर्वांना एकत्र केलं त्याप्रमाणेऊ राज्यातील मराठी माणसांना एकत्र घेऊन राज्यात महाराष्ट्रात शिवरायांच्या विचाराचे राज्य स्थापन व्हावं अशी प्रार्थना केली.

11:27 (IST) 19 Feb 2025
"छत्रपती होते म्हणून आम्ही...", पुण्यातील शिवजयंती कार्यक्रमानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

"केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. छत्रपती होते म्हणून आम्ही आहोत. छत्रपतींनी आम्हाला आत्माभिमान दिला, आत्मतेज दिलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला समतेचा संदेश दिला. १८ पगड जातींना एकत्रित करून ज्या स्वराज्याची त्यांनी स्थापना केली त्या स्वराज्यातून एकतेचा संदेश त्यांनी आम्हाला दिला. राज्यकारभार कसा चालवला पाहिजे हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला शिकवलं. वनसंवर्धन, जलसंवर्धन कसं केलं पाहिजे हे शिवरायांनी शिकवलं. करप्रणाली कशी असली पाहिजे, सुरक्षा, समुद्री सुरक्षा कशी ठेवली पाहिजे हे महाराजांनी आम्हाला शिकवलं," अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन पुण्यातील कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना दिली.

"या सर्व आज्ञावलींचे पालन करत असताना पहिल्यांदा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिला. फारसी भाषेचे शब्द वगळून सगळ्या आज्ञावली मराठी भाषेत करण्याचे काम महाराजांनी आम्हाला दिलं, शिवरायांचे मावळे म्हणूनच आम्ही राज्यकारभार करत आहोत," असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

11:08 (IST) 19 Feb 2025

Shiv Jayanti Live : अकोल्यात शिवजयंतीनिमित्त निघाली 'जय शिवाजी जय भारत' पदयात्रा

अकोल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंती निमित्त शहरामधून जय शिवाजी जय भारत ही पदयात्रा काढण्यात आली आहे. तर या पदयात्रेत शहरातील शालेय विद्यार्थी सह शासकीय अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तर या रॅलीला वसंत देसाई स्टेडियम येथून सुरुवात होऊन ही रॅली टिळक रोड, सिटी कोतवाली चौक, सरकारी बगीचा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी या रॅलीचा समारोप करण्यात आला आहे.

10:26 (IST) 19 Feb 2025
Shiv Jayanti 2025 : बॅनरबाजीवरील खर्च टाळून शिवजयंतीनिमित्त धुळ्यात मोफत दाखवला 'छावा'

धुळ्यात शिवजयंती निमित्त सिनेमा चित्रपटगृहापर्यंत मिरवणूक काढत दर्शकांनी छावा चित्रपट बघितला. शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्याकडून दर्शकांना छावा हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. शिवजयंतीनिमित्त बॅनरबाजीवर वायफळ खर्च न करता आपण संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा हा चित्रपट दर्शकांना दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी यावेळी सांगितले. सिनेमा चित्रपटगृहापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

09:40 (IST) 19 Feb 2025
“शिवरायांचे किल्ले आमच्यासाठी कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे”, देवेंद्र फडणवीसांची किल्ल्यांवरील अतिक्रमणाबाबत 'शिवनेरी'वरून मोठी घोषणा

जगभरातील शिवप्रेमींना छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा. आजपासून पाच वर्षांनी छत्रपती शिवरायांचा ४००वा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. शिवनेरीवरती आल्यावर आपल्याला जी स्वराज्याची स्फूर्ती मिळते ते घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आम्ही सर्व लोक येथे येत असतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवनेरी किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज केवळ एक योद्धा नव्हते तर एक चांगले प्रशासक देखील होते. आम्ही त्यांच्या सर्व किल्ल्यांचा विकास करू. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्व किल्ल्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी एक टास्क फोर्स स्थापन केली आहे, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

"छत्रपती शिवरायांचे किल्ले हे आमच्यासाठी कोणत्याही मंदिरापेक्षा मोठे आहेत. म्हणून या किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे. स्वराज्याची राजधानी रायगड येथे अनेक कामे आपण सुरू केले आहेत. मला सांगताना आनंद वाटतो की आपण एक टास्क फोर्स तयार केला आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरील सगळी अतिक्रमण काढून टाकण्याचा निर्णय आपण घेतला आहे. काही झालं तरी अतिक्रमणं तिथं राहाणार नाहीत" असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

09:31 (IST) 19 Feb 2025
Shiv Jayanti 2025 : शिवजयंतीसारखा दुसरा शुभ मुहूर्त नाही - एकनाथ शिंदे

"हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांना महत्त्व आहे. पण तमाम शिवप्रेमींसाठी साडेतीन मुहूर्तांपैकी शिवजन्माचा मुहूर्त सर्वात अनमोल आहे. शिवप्रभूंच्या जयंतीसारखा दुसरा शुभ मुहूर्त असू शकत नाही," असे एकनाथ शिंदे म्हणाले. काळ कितीही पुढे गेला तरी, कितीही तंत्रज्ञानाच्या बाता मारल्या तरी शिवजी महाराज यांच्यासारखा आदर्श दुसरा कुठला असू शकत नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे शिवनेरी किल्ल्यावर आयोजित जयंती उत्सवात बोलताना म्हणाले.

09:20 (IST) 19 Feb 2025
Shiv Jayanti 2025 : शिवनेरीच्या संवर्धनासाठी निधी कमी पडू देणार नाही, अजित पवारांनी दिला शब्द

"महाराष्ट्रातील गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याची खऱ्या अर्थाने दौलत आहेत. हे गड किल्ले आपले शक्तीस्थान, स्फूर्तीस्थान आहेत. त्यामुळे या गडकिल्ल्यांचा विकास करण्यासाठी महायुतीच्या आघाडी सरकारकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. शिवजन्मभूमी शिवनेरीच्या जतन, संवर्धनासाठी मी मुख्यमंत्र्‍यांच्या साक्षीने सांगतो की त्यांनी आम्हाला सूचना केल्या आहेत की या संवर्धनासाठी निधीची कोणतीही कमतरता आपल्याला भासू द्यायची नाही. हा देखील शब्द मी राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्‍यांच्या साक्षीने देतो," असे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवनेरी येथील शिवजयंती सोहळ्यादरम्यान म्हणाले.

09:02 (IST) 19 Feb 2025
Shiv Jayanti 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत:च्या आवाजातला Video शेअर करत दिल्या जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा!

शिवजयंतीनिमित्त राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे शिवेनेरी किल्ल्यावरील शिवजन्मउत्सवात सहभागी झाले आहेत. यादरम्यान फडणवीस यांनी स्वतःच्या आवाजातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

"चला शिवनेरीला जाऊ, आपल्या श्री छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊ! श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त किल्ले शिवनेरी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे शिवरायांना मानवंदना अर्पित करूया!," असेही फडणवीस आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

08:55 (IST) 19 Feb 2025
शिवजयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची पोस्ट; शेअर केला एक अत्यंत खास Video

"छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी आदरांजली वाहतो. त्यांच्या पराक्रमी आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याचा पाया घातला, पिढ्यांना धाडस आणि न्यायाच्या मूल्यांचे पालन करण्यास प्रेरित केले. ते आपल्याला एक मजबूत, स्वावलंबी आणि समृद्ध भारत निर्माण करण्यास प्रेरित करतात," अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. याबरोबरच प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या आवाजातील एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.

08:44 (IST) 19 Feb 2025

शिवजयंतीनिमित्त राहुल गांधींची खास पोस्ट; म्हणाले, "त्यांचे जीवन सदैव आपल्या सर्वांसाठी..."

शिवजयंतीनिमित्त काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर नमन आणि विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे धाडस आणि शौर्य यामधून त्यांनी आपल्याला निर्भीडता आणि सदैव संपूर्ण समर्पणातून आवाज बुलंद करण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणा स्त्रोत असेल," असे राहुल गांधी म्हणाले.

08:38 (IST) 19 Feb 2025

वसई येथे शिवजयंती साजरा करण्यासाठी हजारोंची गर्दी

वसई येथे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती 'जय शिवाजी-जय भारत' पदयात्रा काढून साजरी करण्यात आली, ज्यात हजारो लोक सहभागी झाले होते. भाजप आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि झाडे लावली. या कार्यक्रमात महानगरपालिका अधिकाऱ्यांचा सहभाग होता आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

08:31 (IST) 19 Feb 2025
Shiv Jayanti Live : शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची शिवनेरी किल्ल्यावर उपस्थिती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह, जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंती सोहळ्यासाठी दाखल.

#watch | Pune | Maharashtra CM Devendra Fadnavis, along with Deputy CMs Eknath Shinde and Ajit Pawar, attend the Chhatrapati Shivaji Maharaj's 395th birth anniversary celebration at Shivneri Fort in Junnar. pic.twitter.com/OfivqamnPg
— ANI (@ANI) February 19, 2025
08:21 (IST) 19 Feb 2025
Shiv Jayanti Live : शिवजयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये रंगला साहसी खेळांचा थरार, अंबादास दानवेंनी चालवली तलवार

शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांना सुद्धा प्रेक्षक म्हणून या मुलांची प्रात्यक्षिके बघत असताना साहसी खेळाचा मोह आवरला नाही. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहरप्रमुख जयसिंग होलिये यांच्यासह अंबादास दानवे यांनी तलवारबाजीचे प्रात्यक्षिक दाखवले. अत्यंत मुरब्बी मावळ्याप्रमाणे दानवे यांनी तलवार चालवली. यावेळी जय भवानी, जय शिवाजी... हर हर महादेव.. जय घोष करत मराठेकालीन साहसी खेळांचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीने सदरील सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नारळ फोडून या मराठेकालीन साहसी खेळास सुरुवात करण्यात आली. नालासोपारा येथील वीर शिवबा नावाने प्रचलित मराठा सैनिकी आखाडा आणि शिवकालीन शस्त्राचे प्रशिक्षण संस्थेने ही प्रात्यक्षिके सादर केली.

08:05 (IST) 19 Feb 2025
शिवभक्तांना आज 'शिवनेरी'वर विनापरवाना प्रवेश

शिवजयंतीनिमीत्त आज (१९ फेब्रुवारी) शिवनेरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. यावेळी पारंपारिक शिवजन्म सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली जाईल. यादरम्यान शिवभक्तांना शिवसनेरी किल्ल्यावर प्रवेशपत्राविना प्रवेश दिला जाणार आहे.

Shiv Jayanti 2025  Highlights 19 February 2025 : देशभरातील शिवजयंती उत्सवाच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

Shiv Jayanti 2025 Updates

Shiv Jayanti 2025 Updates

Story img Loader