सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे आज साताऱ्यात दोन दिवस आधी पोलीस बंदोबस्तात दाखल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची निशाणी असणारी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारा शहरात दोन दिवस आधीच दाखल झाली आहेत. शिवराज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत असताना राज्य सरकारने लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयातून आणली आहेत.आज ती छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात आली. या वाघनखांनी १६५९मध्ये प्रतागडावर अफजलखानाचा वध केला होता.दि ३ ऑक्टोबर सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनघंटीवार यांनी या संग्रहालयातून आणणार होते. मात्र काही कारणास्तव ती यायला उशीर झाला. आज ही वाघनखे साताऱ्यात दाखल झाली. ही वाघनखे साताऱ्यात आणताना गुप्तता पाळण्यात आली होती.
शुक्रवार दि १९ रोजी वाघनखे सातारा शहरात येणार होती. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी या संग्रहालयात स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या संग्रहालयाचे उदघाटन शुक्रवारी दि १९ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार,सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनघंटीवार,पालकमंत्री शंभूराज देसाई,खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीतीत होणार आहे. यानंतर सात महिने ही वाघनखे या संग्रहालयात नागरिकांना पाहता येणार आहेत.
हेही वाचा…मुंबई गोवा महामार्गावर दोन दिवस चार तासांचे ब्लॉक
या संग्रहालयाचे नव्या प्रशस्त इमारतीत उदघाटन आणि स्थलांतर होणार असल्याने या संग्रहालयाची पाहणी पालकमंत्री शंभूराज देसाई व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.साताऱ्यात हे संग्रहालय आहे मात्र यापूर्वी ते छोट्या जागेत असल्याने येथील सर्व वस्तू आणि शस्त्रांचा आनंद घेता येत नव्हता. आता ते मोठ्या प्रशस्त जागेत खुले होत असल्याने नागरिकांना,अभ्यासकांना,इतिहासकार आणि मुलांना येथील खजिना सातारा शहरात एसटी बस स्थानका शेजारी उपलब्ध होणार आहे.