Chhatrapati Shivaji Maharaj statue collapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळला. या दुर्घटनेनंतर महाराष्ट्रातील राजकारण तापले होते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक येथे सदर घटनेबद्दल माफी मागितली. राज्य सरकाने या घटनेची चौकशी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली होती. या समितीने आपला १६ पानांचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. यात पुतळा कोसळण्याच्या विविध धक्कादायक कारणांची माहिती देण्यात आली आहे. हिंदुस्तान टाइम्सने सदर वृत्त दिले आहे.

पुतळा कोसळल्यानंतर याची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलात काम करण्याचा वीस वर्षांहून अधिक अनुभव असलेले पवन धिंग्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमण्यात आली होती. यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (इमारत) संजय दशपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी मुख्य अभियंता विकास रामगुडे, आयआयटी मुंबईच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रा. आर.एस. जांगिड आणि धातू विज्ञान विभागाचे प्रा. परिदा यांचा समावेश होता. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार दोषींवर कारवाई करेल, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

हे वाचा >> Chhatrapati Shivaji Maharaj Statue : सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नौदलाची पहिली प्रतिक्रिया, दुर्घटनेचं कारण काय?

पुतळा कोसळण्याची कारणे काय?

३३ फुटांच्या पुतळ्याचा भार पेलू शकेल इतकी पुतळ्याची बांधणी मजबूत नव्हती. तसेच चुकीच्या पद्धतीने केलेले वेल्डिंग आणि गंज लागल्यामुळे पुतळा कोसळला असा प्राथमिक निष्कर्ष चौकशी समितीच्या वतीने काढण्यात आला आहे. तसेच पुतळा उभारल्यानंतर त्याची योग्य पद्धतीने देखभाल केली नाही, असाही ठपका ठेवण्यात आला आहे. देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यामुळे पुतळा कोसळला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनाच्या निमित्ताने ४ डिसेंबर रोजी या पुतळ्याचे अनावरण केले होते. मात्र २६ ऑगस्ट रोजी पुतळा कोळण्याची दुर्दैवी घटना घडली. यानंतर पुतळा घडविणारा शिल्पकार जयदीप आपटे आणि सदर काम देण्यात आलेला कंत्राटदार चेतन पाटील यांना अटक झालेली आहे. जयदीप आपटेने २८ फुटांच्या प्रत्यक्ष पुतळ्याचे काम केले होते. तर चेतन पाटीलने चौथरा आणि आजूबाजूच्या भागाचे सुशोभिकरणाचे काम केले होते.

हे वाचा >> Shivaji Maharaj Statue : शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर नौदल व राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, नव्या पुतळ्यासाठी योजना तयार

पुतळा कोसळल्यानंतर राज्य सरकारकडून दोन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या. वर नमूद केलेली तांत्रिक समिती होती. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा असा भव्य आणि अत्युत्कृष्ट दर्जाचा पुतळा उभारण्यासाठी वेगळी समिती स्थापन करण्यात आली होती. देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक वेगळी समिती अतिरिक्त मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम विभाग) मनीषा म्हैसकर यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे.

Story img Loader