Chatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फूट उंच पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे हा पुतळा कोसळल्याचा दावा राज्य शासनाने केला आहे. पंरतु, आता यावरून ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सरकावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जातं, चालवलं जातं. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घाईघाईने पुतळ्याचं उद्घाटन केलं. लोकसभेच्या निवडणुकीतील मतांचा विचार करता त्यांना सांगण्यात आलं इतक्या घाईने या पुतळ्याचं अनावरण करू नका. तरीही अनावरण केलं. त्या पुतळ्याच्या बांधकामाविषयी, शिल्पाविषयी अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतले. संभाजीराजे छत्रपती यांनीही आक्षेप घेतला. तरीही तो पुतळा घाईघाईने बसवला. या महाराष्ट्रात छत्रपतींचा अपमान असा कधी झाला नव्हता. औरंगजेब, मुघलनेही राज्यावर अनेक हल्ले केले, पण छत्रपतींचा असा अपमान मोघल सरदारनेही केला नव्हता.”
शिंदेंनी मर्जीतल्या ठेकेदारांना काम दिलं
“आपल्याच राज्यात त्यांच्यावर ही वेळ आली, याला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार जबाबदार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम केलं. शिंदेंनी मर्जीतल्या ठेकेदारांना काम दिलं. ठेकेदार आणि शिल्पकार ठाण्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, आज महाराष्ट्र दुःखी आहे. महाराजांच्या पुतळ्याचे तुकडे झालेले पाहिले, अशी वेळ कधी येईल असं कधी वाटलं नव्हतं”, असं म्हणत त्यांनी शिंदे सरकारवर आरोपही केले.
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा
“पण सरकार अजूनही हसतंय, सरकारच्या चेहऱ्यावर वेदना दिसत नाही. सरकार म्हणत आहे की समुद्रावर जोरात वारा होता. किल्ल्यावर वारा असणारच. १९३३ साली गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवण्यात आला. आजही तो तसाच आहे. तोच वारा, तीच हवा वाहत आहे. तेव्हापासून हा पुतळा खंबीरपणे उभा आहे. पण आठ महिन्यात सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पुतळा तुटला आहे. चांगल्या मनाने त्यांनी पुतळा बनवला नाही, राजकीय मनाने बनवला गेला. मुख्यमंत्र्यांकडून मी आधी राजीनामा मागतो. कारण त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या मनाचा खेळ केला आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागितला आहे.
हेही वाचा >> पुतळा आताच पडला, पण अनास्थेचे वादळ जुने…
सार्वजनिक बांधकाम खात्याने भ्रष्टाचार केला
“छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडलं नाही. त्यांच्या कामातही सार्वजनिक बांधकाम खात्याने घोटाळा केला. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होऊ शकले नाहीत, ते लाडक्या बहिणीच्या गोष्टी करत आहेत. यावर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्रात जे चाललंय ती प्रत्येक गोष्ट आम्ही सांगणार आहोत. हवा त्यांच्या डोक्यात गेली आहे. विश्वगुरू बनले हे, पण शिवाजी महाराजा विश्वपुरूष होते”, असंही संजय राऊत म्हणाले.
मोदी हात लावतात तिथे माती होते
“आपल्या मराठीत म्हण आहे की, हात लावीन तिथे सोनं होतं. पण इथं पंतप्रधान जिथं हात लावतात तिथे माती होते. अयोध्येच्या राम मंदिरात पाणी गळतंय, संसद बनवले, तेही गळतंय. पूल बांधले पण ते आता उद्ध्वस्त होत आहेत. कोस्टल रोड गळतंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावला, ते ही तुटले. गेल्या ७० वर्षातील हे पहिले पंतप्रधान असतील ते जिथे हात लावतील ते उद्ध्वस्त होत आहे. ही श्रद्धा असेल वा अंधश्रद्धा असेल, पण उद्ध्वस्त होत आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी नरेंद्र मोदींवरही हल्लाबोल केला.
© IE Online Media Services (P) Ltd