Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse Sharad Pawar NCP to Protest : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आंदोलनाच्या पावित्र्यात आहे. पक्षाने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे, शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या झालेल्या अपमानाविरोधात राष्ट्रवादी (शरद पवार गट) मैदानात, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उद्या (२८ ऑगस्ट) घटनास्थळी जाणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने म्हटलं आहे की “हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे घाईगडबडीत केलेले अनावरण हे स्वराज्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहचवणारे ठरले आहे. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट घटनास्थळी जाऊन याविरोधी आंदोलनाचा पुकारा दिला आहे. उद्या (२८ ऑगस्ट २०२४) सकाळी ११.०० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्याजवळ हे आंदोलन करण्यात येईल”.
शरद पवार गटाने म्हटलं आहे की “महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या पुतळ्याची पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची एवढी घाई का करण्यात आली? तसेच या घटनेशी संबंधित सर्व अधिकारी, कंत्राटदार व इतर यंत्रणेच्या बेजबाबदारीचा जाब या आंदोलनाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांना विचारण्यात येणार आहे. यासह पक्षाच्या वतीने सर्व राज्यभरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्थानिक पातळीवर आंदोलन करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे”.
समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादवांचा संताप
समाजवादी पार्टीचे प्रमुख व उत्तर प्रदशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे की “भाजपाने आतापर्यंत ज्या-ज्या वास्तूंची, स्मारकांची निर्मिती केली आहे त्या केवळ भ्रष्टाचाऱ्यांना भेट म्हणून बनवल्या आहेत. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं. तो पुतळा कोसळणं ही खूपच वेदना देणारी व दुर्दैवी घटना आहे. या पुतळ्याच्या बांधकामाशी संबंधित सर्व शासकीय व निमशासकीय लोकांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर व दंडात्मक कारवाई करायला हवी. या घटनेने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत भाजपाच्या या भ्रष्टाचारी कृत्यांना सडेतोड उत्तर देईल आणि त्यांचं भ्रष्ट सरकार पाडेल”.