Chhatrapati Shivaji Maharaj Temple Bhiwandi: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्ताने भिवंडीत पहिल्या शिव मंदिराचं उद्घाटन सोमवारी पार पडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची गाथा या शिवमंदिराच्या माध्यमातून शिवप्रेमींना पाहायला मिळेल असं सांगितलं जात आहे. एखाद्या किल्ल्याप्रमाणेच रचना असणाऱ्या या मंदिराला शिवप्रेमींनी भेट द्यावी, असं आवाहन व्यवस्थापन समितीकडून करण्यात आलं आहे. या मंदिराला तात्काळ तीर्थस्थळाचा दर्जा दिला जाईल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पण नेमकं कसं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर?

या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती या मंदिरात आहे. अयोध्येतील राम मंदिरातल्या प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती घडवली आहे. गडकिल्ल्यांच्या रचनेनुसारच या मंदिराची रचना असून एकूण अडीच हजार चौरस फुटांच्या परिसरात हे मंदिर उभारण्यात आलं आहे. या मंदिरासाठी एकूण तटबंदी ही पाच हजार चौरस फूट इतक्या आकाराची आहे.

मंदिराभोवती तटबंदी, बुरूज

मंदिराच्या उभारणीसाठी ७ ते ८ कोटी रुपये खर्च झाले असून त्यातील शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट आणि काही भाग लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. ह. भ. प. डॉ. कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुविशारद विजयकुमार पाटील यांनी मंदिराची रुपरेखा निश्चित केली आहे. मंदिराच्या भोवती तटबंदी, बुरूज आणि महाद्वार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराची उंची ४२ फूट इतकी असून मंदिरासाठी एकूण पाच कळस आहेत.

मंदिराच्या गाभाऱ्यावर ४२ फुटांचं सभामंडप, त्याभोवती गोलाकार बुरूज, टेहळणी मार्ग अशा किल्ल्याशी साधर्म साधणाऱ्या गोष्टी मंदिरात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. हे सर्व बांधकाम दगडाच्या सहाय्याने करण्यात आलं आहे. मंदिराच्या तटबंदीच्या आतील भागात ३६ विभाग असून त्यातून छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडणारी भव्य शिल्पे घडवण्यात आली आहेत.

साडेसहा फूट उंचीची मूर्ती

शिल्पकार अरुण योगीराज यांनी तब्बल साडेसहा फूट उंचीची मूर्ती या मंदिरात स्थापन करण्यात आली आहे. मंदिराच्या सर्व खांबांवर कोरीव नक्षीकाम आहे. या मंदिराला महिरपी कमान देखील आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंदिराचं उद्घाटन

“महाराजांचं मंदिर कशासाठी? ते यासाठी की आज आपण आपल्या इष्टदेवतेच्या मंदिरात जाऊन साधना करू शकतो याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी देव, देश, धर्माची लढाई जिंकली म्हणून तुम्ही-आम्ही हिंदू आहोत. जसं हनुमानाचं दर्शन घेतल्याशिवाय प्रभू श्रीरामांचं दर्शन पूर्ण होत नाही, तसं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय कुठल्याच देवाचं दर्शन आपल्याला फळणार नाही”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात केलेल्या भाषणादरम्यान सांगितलं.

“इथे फक्त मंदिर नाहीये. त्याला सुंदर तटबंदी आहे. बुरूज आहेत. दर्शनीय असा प्रवेशमार्ग आहे. बगीच्याची जागा आहे. शिवरायांच्या जीवनातले सर्व प्रसंग आपल्याला तिथे पाहायला मिळतात. अतिशय सुंदर अशा शिल्पांमध्ये शिवरायांच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंत आणि छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला त्या प्रसंगापर्यंतचे सर्व प्रसंग आपल्याला या मंदिरात पाहायला मिळतात”, असं मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले.

“छत्रपती शिवरायांसोबत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीही इथे आहे आणि राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ माँसाहेबही इथे आहेत. त्यामुळे हे खऱ्या अर्थानं राष्ट्रमंदिर आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी मंदिराचं वर्णन केलं.

Story img Loader