वाई : श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे शाहूमहाराज भोसले (वय ७५) यांचे वृद्धापकाळाने पुणे येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या मागे वृषालीराजे भोसले या कन्या आहेत.ते खासदार उदयनराजे, आमदार शिवेंद्रसिंहराजे व विक्रमसिंहराजे यांचे चुलते होते. रात्री उशीरा पार्थिव साताऱ्यातील अदालत वाड्यात आणले जाणार आहे.अंत्यसंस्कार बुधवारी होणार आहेत.
शांत संयमी सुसंस्कृतव आपल्या साधेपणाची त्यांची ओळख होती. साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक कार्यात त्यांचे भरीव योगदान होतं. त्यांनी सलग सहा वर्ष सातारचे नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले.या काळात त्यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले. उदयनराजे व शिवेंद्रसिंह राजे यांचयातील वाद विकोपाला गेल्यावर त्यांनी दोघांना एकत्र आणून राजघराण्यातील वाद संपवून मनोमिलन घडवून आणले .ते महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष होते. आरे गावच्या श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते, श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवाधाम अग्नि मंदिर करंजे यांचे ते कार्याध्यक्ष होत. छत्रपती शिवाजीराजे साताऱ्यातील आदालत वाडा येथे राहत होते तो आदालत वाडा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून न्यायनिवाडा करणारा वाडा म्हणून सुपरिचित होता व आज देखील आहे. आजही या वाड्यातून दिलेला शब्द अथवा आदेश हा सातारकर सन्मानपूर्वक अंतिम म्हणतात.उद्या अदालतवाडा येथे सकाळी ९ वाजता अंत्यदर्शनासाठी होणार असून एक वाजता तेथून अंतयात्रा निघणार आहे.कृष्णा तीरावर संगम माहुली येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.