भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवणे, कारची रेस, डान्स करण्यामुळे सतत चर्चेत असतात. अशातच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा सातारा दौऱ्यावर होते. यावेळी उदयनराजे भोसले यांच्या डान्स आणि कॉलर उडवण्याबाबत अजय मिश्रा यांना पत्रकारानं सवाल विचारला. तेव्हा, अजय मिश्रा यांना सारवासारव करावी लागली आहे. तर, बाजूलाच बसलेले उदयनराजे भोसले तीक्ष्ण नजरेने पत्रकाराकडे पाहत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

अजय मिश्रा यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकारानं प्रश्न उपस्थित केला की, तुमचा पक्ष शिस्तीबाबत बोलतो. पण, तुमच्या बाजुला बसलेले खासदार खुलेआम कॉलर उडवतात. मुलींबरोबर डान्स करतात. ही शिस्त आहे का? हे भाजपाचे चेहरे आहेत. ते असं करत असतील, तर चांगलं आहे का?

यावर अजय मिश्रा म्हणाले, “पक्षात पूर्ण शिस्त आहे. कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यावर बोलू शकत नाही. भाजपाच्या कोणत्या कार्यक्रमात त्यांनी डान्स केलाय का? तुम्ही तुमच्या घरात काय करता, हा आमचा विषय नाही. तुम्ही कोणत्या कार्यक्रमात जाता, हा व्यक्तिगत प्रश्न आहे.”

“पक्षाच्या कार्यक्रमात, संघटनेत आणि निवडणुकीत नेते, कार्यकर्ते पूर्ण शिस्तबद्ध असतात. हा तुमचा भ्रम आहे. पक्षाचे १० लोक एकत्र येतात, तो व्यक्तिगत कार्यक्रम असतो,” असं म्हणत मिश्रा यांनी सारवासारव केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhatrapati udayanraje bhosale blowing his collar dancing stage this bjp discipline ministrer ajay kumar mishra clarify ssa