छत्तीसगडमधील नक्षलवादी हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर तेथील नक्षलवादी गडचिरोलीच्या जंगलात येण्याची शक्यता गृहीत धरून संपूर्ण गडचिरोली जिल्हय़ात गृह मंत्रालयाने अतिदक्षतेचा इशारा दिला असून नक्षलवाद्यांच्या विरोधातील शोध मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान आज राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. के. जैन यांनी गडचिरोलीत तातडीच्या बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
छत्तीसगडमधील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या हत्याकांडामुळे राजकीय वर्तुळ कमालीचे हादरले आहे. प्रदेश पातळीवर सक्रिय असलेल्या नेत्यांना ठार करून नक्षलवाद्यांनी त्यांचा लोकशाहीविरोधी चेहरा दाखवून दिल्याने नेत्यांच्या वर्तुळात कमालीची अस्वस्थता आहे. अतिशय सुनियोजित पद्धतीने अशी हत्याकांडे घडवून आणणारे नक्षलवादी त्यांच्या प्रभाव क्षेत्रात आणखी असेच प्रकार करू शकतात ही शक्यता गृहीत धरून राज्याच्या गृहमंत्रालयाने नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या गडचिरोलीत अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. छत्तीसगडमधील ज्या सुकमा जिल्हय़ात नक्षलवाद्यांनी हे हत्याकांड घडवून आणले तो जिल्हा गडचिरोलीपासून बराच दूर असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून दक्षिण गडचिरोलीत नक्षलवादविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
या घटनेमुळे आता छत्तीसगडमध्ये मोठय़ा प्रमाणावर शोध मोहीम हाती घेण्यात आल्याने नक्षलवादी शेजारच्या राज्यांमधील जंगलात आश्रय घेऊ शकतात, ही शक्यता गृहीत धरून मोहिमेला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्तीसगडमधील घटनेचा सूत्रधार कटकम सुदर्शन ऊर्फ आनंद होता असे गुप्तचर यंत्रणेचे म्हणणे असले तरी काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एकटय़ा आनंदने ही कामगिरी घडवून आणलेली नाही. आनंदसोबत दंडकारण्य स्पेशल झोन समितीच्या मिल्ट्री विभागाचा प्रमुख गंगण्णा ऊर्फ बसवराज आणि आसण्णा ऊर्फ सतिश हेसुद्धा होते असे अधिकारी सांगतात. दंडकारण्य स्पेशल झोन समितीत दक्षिण गडचिरोलीचासुद्धा समावेश असल्याने नक्षलवादी या भागातसुद्धा हिंसक घटना घडवून आणू शकतात अशी भीती व्यक्त होत असल्याने सर्वाना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही महिन्यांत गडचिरोली पोलिसांची नक्षलवाद्यांच्या विरोधातली कामगिरी अतिशय चांगली राहिली आहे. या पाश्र्वभूमीवर कोणतीही घटना घडू नये म्हणून छत्तीसगडच्या सीमेवर शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या घटनेत सुरक्षेसंबंधीच्या नियमांचे पालन झाले नाही. हा प्रकार गडचिरोलीत घडू नये म्हणून दुर्गम भागात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आहे. राज्याच्या विशेष मोहीम विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक पी. के. जैन यांनी आज गडचिरोलीत येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेली पोलीस ठाणी तसेच त्यात कार्यरत असलेल्या जवान व अधिकाऱ्यांच्या स्थितीची माहिती आज जैन यांनी घेतली. नक्षलवादी छत्तीसगडप्रमाणेच या भागातील राजकीय नेत्यांना लक्ष्य करू शकतील, ही भीती लक्षात घेऊन स्थानिक अधिकाऱ्यांनी या नेत्यांच्या संपर्कात राहावे, अशी सूचना जैन यांनी या वेळी केली. दुर्गम भागात फिरताना स्थानिक नेत्यांनी अधिक काळजी घ्यावी, अशा सूचना सर्वाना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती आज गडचिरोलीचे पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र कदम यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
छत्तीसगडचे नक्षलवादी गडचिरोलीच्या जंगलात आश्रय घेण्याची दाट शक्यता
छत्तीसगडमधील नक्षलवादी हिंसाचाराच्या पाश्र्वभूमीवर तेथील नक्षलवादी गडचिरोलीच्या जंगलात येण्याची शक्यता गृहीत धरून संपूर्ण गडचिरोली जिल्हय़ात गृह मंत्रालयाने अतिदक्षतेचा इशारा दिला असून नक्षलवाद्यांच्या विरोधातील शोध मोहीम अधिक तीव्र करण्याच्या सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
First published on: 29-05-2013 at 01:21 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhattisgarh naxal attack attacker chances for shelter in dense forest gadchiroli