शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा अमलात आणल्यामुळे बीफ  मटण उपलब्ध होणे अशक्य असल्याच्या पाश्र्वभूमीवर सोलापुरात महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातील सिंह, बिबटे व मगरींना खाद्य म्हणून आता बीफऐवजी चिकन दिले जात आहे. या मांसाहारी प्राण्यांना दररोज ३० किलो चिकन खाऊ घातले जाते, तर शंकर नावाच्या वयोवृद्ध सिंहाला दररोज चिकनबरोबर दूधही दिले जाते.
विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्ध मंदिराजवळ ३५ वर्षांपूर्वी उभारेलेल्या महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयात सिंह, बिबटे, मगरींबरोबर हरिण, काळविट, मोर, विविध जातींचे माकड, दुर्मीळ पक्षी पाहावयास मिळतात. अबालवृद्ध सोलापूरकरांना या प्राणिसंग्रहालयाचे आकर्षण आहे. काही वर्षांपूर्वी नवी दिल्लीच्या राष्ट्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने अपुऱ्या सुविधा लक्षात घेऊन सोलापूरच्या या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याची कारवाई हाती घेतली होती. त्याच सुमारास या प्राणिसंग्रहालयातील तब्बल २८ हरणांचे एकाचवेळी संशयास्पद मृत्युकांड झाले होते. या पाश्र्वभूमीवर तत्कालीन पालिका आयुक्त मच्छिंद्रनाथ देवणीकर यांनी या प्राणिसंग्रहालयाच्या विकासासाठी भरीव कार्यक्रम राबविला आणि हे प्राणिसंग्रहालयाचे अस्तित्व कायम राहू शकले.
गेल्या दीड महिन्यापूर्वी या प्राणिसंग्रहालयात लखनौ येथून चार बिबटे दाखल झाले. सोलापूरचे वाढते तापमान या बिबटय़ांना सहन करता यावे म्हणून त्यांच्या पिंजऱ्यात कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पाण्याचे डबकेही तयार करण्यात आले आहे. तथापि, अलीकडे शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू केल्याने प्राणिसंग्रहालयातील एका सिंहासह चार बिबटे व १७ मगरींना दररोज बीफ मटणाऐवजी चिकनचा आहार  दिला जात आहे. शंकर नावाच्या सिंहाचे वय २४ वर्षांचे असून या वृद्धपणात सिंहाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्यास दररोज चार किलो चिकनबरोबर दोन लिटर दूध दिले जाते. दुधामुळे सिंहाला व्हिटॅमिन व आवश्यक मिनरल मिळतात व त्यास ताजेतवाने वाटू लागते. त्याची त्वचाही चांगली राहते. बिबटय़ांना दररोज प्रत्येकी चार किलो चिकन दिले जाते, तर मगरींसाठी सात किलो चिकन पुरविले जाते. बीफची सवय असलेल्या या प्राण्यांना आता चिकन खाण्याची सवय बाळगावी लागणार आहे.

Story img Loader