लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्हा न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर अहमद औटी हे आपल्या ३२ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायिक सेवेतून निवृत्त झाले. जन्मतः दिव्यांग असूनही अधिक कार्यक्षमता, गुणवत्ता आणि संवेदनशीलता जपत न्यायदानाचे कार्य केलेले न्या. डॉ. औटी यांच्यावर पुष्पवृष्टी निरोप देताना संपूर्ण न्यायालयातील सहकारी न्यायाधीश व वकिलांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. प्रेमाचा निरोप घेताना न्या. डॉ. औटी यांच्याही नेत्रांतून अश्रूधारा बरसल्या.
३२ वर्षांपूर्वी सोलापूर जिल्हयातूनच न्यायाधीश म्हणून सुरू झालेला डॉ. शब्बीर अहमद औटी यांचा प्रवास पुन्हा सोलापूर जिल्ह्यातच संपला. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशपदावरून सेवानिवृत्त होताना संपूर्ण न्यायालयात कार्यरत असलेले सहयोगी न्यायाधीश, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सेवाकाळातील शेवटच्या दिवसाचे अनोख्या पध्दतीने स्वागत केले. प्रवेशद्वारापासून दुतर्फा उभे राहून ओंजळीत गुलाबाच्या पाकळया आणि फुलांची डॉ. औटी यांच्यावर मुक्त उधळण केली. या प्रेमाने डॉ. औटी अक्षरशः भारावून गेले. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. ज्या न्यायीक आधिकाराच्या खुर्चीने आपणास पत, प्रतिष्ठा सर्व काही दिले, त्या पवित्र पवित्र अखेरचा प्रणाम करताना त्यांच्या भावनांचा बांध फुटला.
न्या. डॉ. औटी यांची न्यायदान क्षेत्रातील कारकीर्द उत्तुंग ठरली. अनेक प्रलंबित खटले निकाली काढताना प्रशासकीय कामकाजाचा आवाका उल्लेखनीय ठरला. अनेक महत्वाचे निर्णय त्यांच्या कार्यकाळात झाले. जिल्हा न्यायालयाची नवीन अकरा मजली इमारतीला प्रशासकीय मान्यता, माढा आणि करमाळा येथे वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचा शुभारंभ, न्यायालय परिसरात संविधानाच्या आकर्षक उद्देशिकेचे अनावरण, वकील व न्यायिक आधिकाऱ्यांमध्ये उत्तम समन्वय आदी कामामुळे डॉ. औटी यांची कारकीर्द जिल्हा न्यायालयात ऐतिहासिक ठरली. एखाद्या जिल्हा न्यायाधीशाला निवृत्तीपश्चात अशा प्रकारे अनोख्या पध्दतीने भावपूर्ण देण्याचा अलिकडच्या काळातील हा पहिलाच प्रसंग असल्याचे सांगण्यात आले.