महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर करण्यासाठी सर्वाच्या सहकार्याने शासन यंत्रणा शर्थीने प्रयत्न करीत आहे. परंतु पाणी जपून वापरले व वाचविले तरच या प्रयत्नांना यश येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ यांच्या वतीने दुष्काळ निवारण अभियान, यात्रोत्सव व अखिल भारतीय कृषी प्रदर्शन या कार्यक्रमांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री गुरूवारी त्र्यंबकेश्वर येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी २०१५-१६ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी शासनाने भक्कम तरतूद केली असून केंद्र शासनाच्या केंद्राच्या मदतीने आवश्यक ती सर्व कामे उत्तम व कायमस्वरूपी होतील, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
आजच्या प्रगतीच्या युगात पाश्चात्यांचे भारतीय संस्कृतीवरील आक्रमण निश्चितच चिंतेची बाब आहे. अशा परिस्थितीत स्वामी समर्थ संस्कार केंद्राकडून होत असलेले कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे. अण्णासाहेब मोरे व त्यांच्या सेवेकऱ्यांनी त्र्यंबकेश्वर परिसरासह राज्यातील अनेक भागांचा कायापालट केला आहे. त्यांच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या अद्ययावत रुग्णालयाची जागा व जागेचे आरक्षण यात कोणतीही अडचण येऊ देणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळग्रस्तांसाठी चारा व पाण्यासाठी शेकडो टाक्या देण्याचा त्यांचा प्रकल्पही आदर्शव्रत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वामी समर्थ सेवा केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांना शासनाचे पाहुणे या दृष्टिने योग्य त्या सुविधा पुरविणे वावगे ठरणार नाही, असे सांगितले.
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी साधू, महंत व महाराजांच्या भानगडी पहावयास व ऐकावयास मिळतात. परंतु अण्णासाहेब हे संस्कारमय पिढी घडविण्याचे कार्य करीत असल्याचे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमास खा. गोपीनाथ मुंडे, आदिवासी विकासमंत्री बबन पाचपुते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, डॉ. विजयकुमार गावित, गुलाब देवकर आदी उपस्थित होते.

नेत्यांचे चिमटे
त्र्यंबकेश्वरच्या या कार्यक्रमात भाषणबाजीच्या खेळात नेत्यांमध्ये एकमेकांना चिमटे काढण्यात स्पर्धा लागल्याचे दिसून आले. खा. गोपीनाथ मुंढे यांनी भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांना एक वर्ष निवडणुकीसाटी बाकी आहे, त्यामुळे त्वरेने कामे करा अन्यथा पुढे आम्ही ती कामे पूर्ण करू, असा चिमटा काढला. मुख्यमंत्री दुष्काळाचे संकट शासन यंत्रणा सर्वाच्या सहकार्याने दूर करण्यासाठी शर्थीने प्रयत्न करीत असल्याचे सांगत असतानाच दुसरीकडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शासन त्या अनुषंगाने निर्णय घेत असले तरी प्रत्यक्षात त्याच्या अंमलबजावणीकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.

Story img Loader