मराठा समाजाला आरक्षण देण्याच्यादृष्टीने ठोस पावले टाकली जात आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी शिवनेरी येथे केले. किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जयंतीनिमित्त पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार बापूसाहेब पठारे, विनायक मेटे, युवराज संभाजीराजे आदी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, मराठा समाजातील शेतकरी कुटुंबांची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. काही अपवाद वगळल्यास मराठा समाजातील लोक नोकऱ्या आणि उद्योगातही उच्चपदावर कमीच ठिकाणी आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरू आहे. पण आरक्षणाचा निर्णय न्यायालयीन कसोट्यावर टिकावा, त्यावरून कोणताही वाद निर्माण होता काम नये, यासाठी आकडेवारी तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामध्ये विद्यार्थी, शासनाच्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याबाबतच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. याबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने उत्कृष्ट काम केले आहे. इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन ठोस पावले टाकली जात आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रात स्मारक उभारण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाली आहे. हे स्मारक जगातील उत्कृष्ट असे स्मारक व्हावे, यासाठी जगभरातून स्मारकासाठी संकल्पना मागविण्यात येणार आहेत, असेही चव्हाण यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा