Sanjay Raut On Eknath Shinde And Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांची साथ सोडत भाजपाशी हात मिळवणी केली होती. त्यानंतर शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांच्या विरोधात शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या काळात राऊत सातत्याने एकनाथ शिंदे, त्यांचे आमदार आणि भाजपावर टीका करत त्यांच्याशी भिडत आहेत. अशात आता संजय राऊत यांनी आणखी खळबळजनक दावे केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत

“शिंदे हे स्वतःला अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायला तयार नाहीत. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे व फडणवीस यांची तोडे दोन दिशांना होती. आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत. कारण शिंदे यांच्या हातात काहीच राहिलेले नाही,” असे संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील रोखठोक सदरात म्हटले आहे. यावेळी संजय राऊत यांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

आपली फसवणूक झाली असे शिंदेंना वाटते

यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक आमदार आणि त्यांच्यात विमानात झालेल्या संभाषणाबाबतही लिहिले आहे. “निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढवू व २०२४ नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका. निवडणुकीत खर्च करा, असे आश्वासन अमित शहा यांनी शिंदे यांना दिले होते. शिंदे यांनी निवडणुकीत प्रचंड पैसा टाकला, पण शहा यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही व आपली फसवणूक झाली असे शिंदे यांना वाटते”, असे शिंदे यांच्या आमदाराने सांगितल्याचे राऊत यांनी लिहिले आहे.

…फोन टॅप केले जात आहेत

यावेळी खासदार संजय राऊत यांनी असेही म्हटले की, “या आमदाराने पुढे माहिती दिली ती महत्त्वाची आहे. त्यांचे व त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत असे शिंदे यांना खात्रीने वाटते व दिल्लीच्या तपास संस्था आपल्या हालचालींवर पाळत ठेवून असल्याचा शिंदे यांना संशय आहे, पण शिंदे यांची आता पुरती कोंडी झाली आहे.”

दरम्यान तीन महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत राज्यातील सत्ता कायम राखली. यामध्ये भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. भाजपाने सर्वाधिक जागा जिंकूनही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी आग्रही होते, असे दावे अनेकांकडून केले जात होते.