लातूर – सोयाबीनचे भाव गेल्या काही महिन्यापासून सतत कमी होत आहेत त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. ती अडचण दूर करण्यासाठी निर्यात अनुदान देण्याची शिफारस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून केली आहे .
देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की राज्यातील सोयाबीन उत्पादक, सोयाबीनच्या किमती पडल्यामुळे अतिशय अडचणीत सापडला आहे. यावर्षी वीस लाख टन सोयाबीनचे अतिरिक्त उत्पादन झाले आहे ,याशिवाय मका व भातापासून इथेनॉल निर्मिती करण्याची परवानगी दिल्यामुळे वीस लाख टन अतिरिक्त पेंड बाजारपेठेत उपलब्ध आहे. व ही पेंड सोयाबीन पेंडी पेक्षा कमी भावामध्ये मिळते आहे त्यामुळेही सोयाबीन पेंडीचे भाव घसरले आहेत .परिणामी सोयाबीनच्या भावात यामुळे घसरण होत आहे.
राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोयाबीन भाव स्थिरतेसाठी सोयाबीन पेंडीला निर्यात अनुदान द्यावे अशी शिफारस केली आहे त्यामुळे आपण केंद्र सरकारला विनंती करत आहोत की संबंधित खात्याकडे योग्य ती शिफारस करावी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन पेंडीच्या निर्यातीला अनुदान मंजूर करावे अशी शिफारस आपण करत आहोत. याचा योग्य तो विचार करून तातडीने अंमलबजावणी करण्याची विनंती ही फडणवीस यांनी अमित शहा यांना केली आहे.