शिवसेनाप्रमुखांनी तेव्हा युती केली म्हणून आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. ठाकरे चित्रपटाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलासपणे मन की बात केली.

शिवसेना-भाजपाची त्यावेळी युती झाली त्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो. तेव्हा युती झाली नसती तर आमचा इथपर्यंत प्रवास झाला नसता. आमच्या युतीच्या चर्चेमध्ये अडचण आली तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मोठय़ा मनाने निर्णय करायचे आणि त्यामुळे युती टिकायची, आताही आम्ही मार्ग काढू असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

ते पुढे म्हणाले, शिवसेना-भाजपा युतीमध्ये अनेकदा अडचणीची वेळ आली, पण त्या अडचणीदेखील आम्ही दूर केल्या. त्यावेळी आम्ही लहान कार्यकर्ते होतो. आम्हाला फक्त ‘मातोश्री’च्या बाहेर उभे राहायला जागा मिळाली तरी आनंद वाटायचा. तेव्हा युतीच्या चर्चा काय व्हायच्या ते माहिती नाही. मात्र तेव्हा अडचण आली तर बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस मोठय़ा मनाने निर्णय करायचे. त्यामुळे युती टिकायची. तेव्हा प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे होते. बाळासाहेबांचा स्वभाव प्रमोद महाजन यांना माहिती होता. प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे  यांची जबाबदारी आता आमच्यावर आहे. आम्ही मार्ग काढू. चिंता कशाला करता, असे उत्तर देताच सभागृहात एकच हशा उसळला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपट येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांना ‘मानाचा मुजरा’ हा कार्यक्रम सोमवारी नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुधीर गाडगीळ यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता अतिशय मनमोकळेपणाने उत्तरे दिली. हा कार्यक्रम येत्या रविवार, २० जानेवारी रोजी कलर्स वाहिनीवरून सायंकाळी ७ वाजता प्रसारित होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी क्रिकेटपटू राजू कुलकर्णी, विनोद कांबळी, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी, कॉमेडी किंग राजू श्रीवास्तव यांनीही आठवणींतील बाळासाहेब उलगडले. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजित पानसे आदी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Story img Loader