रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरुवारी मांडलेला रेल्वे अर्थसंकल्प विकासाच्या वाटा अधिक विस्तारित करणारा, सर्वसामान्यांवर कुठलाही बोजा न टाकता त्यांचा प्रवास अधिक सुखकर करणारा आहे. महाराष्ट्र आणि मुंबईकर म्हणून त्यांनी राज्यालाही भरभरून दिले आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
हा रेल्वे अर्थसंकल्प ‘अॅडव्हाण्टेज महाराष्ट्र’ असून, खान्देशला प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. या विकासातून मोठा लाभ या प्रदेशाला मिळेल. विकासाचा एका नवा प्रवाह रूजविण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून झाला असून, रेल्वेच्या पायाभूत विकासात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचा मनोदय व्यक्त करून त्यांनी विकासाच्या कक्षा आणखी रूंदावल्या आहेत. ही घोषणा निश्चितपणे विकासाचे इंजिन म्हणून कार्य करेल. महाराष्ट्रासाठीची तरतूद २०६ टक्क्यांनी वाढली असून, मराठवाडा आणि विदर्भालाही मोठा वाटा यातून मिळणार आहे. स्पेशल पर्पज व्हेईकलमध्येही महाराष्ट्राला मिळालेला वाटा मोठा आहे. रेल्वेच्या मोकळ्या जागांवर शेतकरी, मासेमारांसाठी कोल्ड स्टोरेज उभारण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यात स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा मनोदय सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. रेल्वे मार्गांचाही शेतकऱ्यांना वापर करता यावा, हा सूक्ष्मपणे केलेला विचार मला मोलाचा वाटतो. एकीकडे रेल्वे भक्कम करायची आणि त्याचवेळी प्रवाशांना अधिक सुलभपणे व्यवहार करता यावे, यासाठी अत्याधुनिक तंत्राच्या अधिक वापरावर भर द्यायचा, याचे योग्य संतुलन यात राखण्यात आले आहे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
राज्यातील अनेक रेल्वे उड्डाणपूल, अंडरब्रीज यांना मान्यता, अनेक नवीन रेल्वे मार्गांची कामे, नवीन मार्गांचे सर्वे यावर भरीव तरतूद करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील रेल्वे प्रकल्पांना गती मिळेल आणि राज्यात रेल्वेचा समतोल विकास साधता येईल. एमयुटीपी-3ची मान्यता, तसेच चर्चगेट ते विरार आणि सीएसटी ते पनवेल या दोन उन्नत कॉरिडॉरच्या कामाला गती हे निर्णय मुंबईकरांचे सुद्धा प्रश्न सोडविणारे आहेत. सुरेश प्रभू हे मुंबईकर असल्याने त्यांना मुंबईच्या समस्या ठाऊक आहेत. त्यामुळे मुंबई आणि महाराष्ट्राला अतिशय आश्वासक स्वरूपाचा तसेच युवा, महिला आणि वृद्ध अशा सर्व घटकांना सुखावणारा हा रेल्वे अर्थसंकल्प आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 25th Feb 2016 रोजी प्रकाशित
रेल्वे अर्थसंकल्प विकासाच्या वाटा अधिक विस्तारित करणारा – फडणवीस
महाराष्ट्र आणि मुंबईकर म्हणून त्यांनी राज्यालाही भरभरून दिले आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-02-2016 at 19:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister devendra fadnaviss reaction of railway budget