अमरावतीमध्ये नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या औषध व्यावसायिकाच्या हत्येमुळे सध्या खळबळ उडाली आहे. सुरुवातीला या हत्येचा संबंध नूपुर शर्मा प्रकरणाशी नसल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र राज्यात सत्ताबदल होताच पोलिसांनी घूमजाव केलं आणि हत्येचा संबंध नूपुर प्रकरणाशी असल्याची कबुली शनिवारी दिली. गृहमंत्रालयानेही या घटनेची दखल घेतली असून तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटीव्हीशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदेंना अमरावतीमधील घटनेसंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “ही घटना नक्कीच चिंताजनक आहे. ज्यांनी हत्या केली आहे त्या सर्वांना अटक करण्यात आलं असून एनआयएने तपास हाती घेतली आहे. ही घटना राष्ट्रीय स्तरावरील असून सरकारचंही त्यावर लक्ष आहे”.
नेमकं काय झालं होतं?
औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी हत्या करण्यात आली होती. नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर संदेश केल्यामुळेच हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्टपणे नाकारलं होतं आणि पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून हत्या झाल्याचा निष्कर्ष काढला होता. आता मात्र पोलिसांनी हत्येच्या घटनेचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोल्हे यांनी सोशल मीडियावर नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारा संदेश प्रसारित केला होता. तपासात ही घटना नुपूर शर्मा प्रकरणाशी संबंधित असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झालं असून उर्वरित तपास सुरू आहे, असे पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी शनिवारी पत्रकारांना सांगितले.
कोल्हे दुकान बंद करून दुचाकीने घरी जात असताना रात्री १०.३० वाजता श्याम चौकातील घंटाघर परिसरात त्यांच्यावर चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून सहा जणांना अटक केली. मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दूल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान उर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२) आणि युसूफ खान बहादूर खान (४४) अशी आरोपींची नावं आहेत. एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
तीन आरोपींनी कोल्हे यांच्यावर सलग तीन दिवस पाळत ठेवली होती. दररोज रात्री कोल्हे दुकान बंद करून घंटाघरमार्गे घरी जातात, हे आरोपींच्या लक्षात आले होते. पाळत ठेवणाऱ्या आरोपींनी आपल्या साथीदारांना ही माहिती दिली. घटनेच्या दिवशी दोन दुचाकींवरून आलेल्या आरोपींनी कोल्हे यांना रोखलं आणि त्यांच्या गळय़ावर चाकूने वार केले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सुरुवातीला दोन आरोपींना अटक केली आणि नंतर इतर चार आरोपींना ताब्यात घेतलं.
कोल्हे यांच्या हत्येचा नूपुर शर्मा प्रकरणाशी सबंध आहे का, याचा तपास ‘एनआयए’ने करावा, अशी मागणी खासदार डॉ. अनिल बोंडे, भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती. या हत्येचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध असल्याचे भाजपा नेते वारंवार सांगत होते. पण पोलीस या घटनेबाबत कुठल्याही प्रकारची माहिती माध्यमांना देण्यास तयार नव्हते. अखेरीस भाजपाच्या नेत्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्रालयात दाद मागितल्यानंतर पोलिसांनी असा संबंध असल्याचे मान्य केलं.
नुपूर शर्मा यांचे समर्थन करणारे संदेश प्रसारित केल्यामुळे काही दिवसांपूर्वी उदयपूर येथे एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. अमरावती आणि उदयपूरच्या घटनेत काही साम्यस्थळे आहेत का? आरोपी कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत? कोल्हे यांना कोणी धमकावले होते का? याचाही छडा तपास यंत्रणा लावणार आहेत.
तपास ‘एनआयए’कडे
कोल्हे हत्या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. गृहमंत्री कार्यालयाने ‘ट्विटर’द्वारे ही माहिती दिली. हे प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आले असून या हत्येचे षडयंत्र, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंध याचा संपूर्ण तपास केला जाणार असल्याचे संदेशात म्हटले आहे.