शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा सत्तांतर होईल असं भाकीत वर्तवलं असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांना स्वप्नातच राहू द्या असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत काय म्हणाले आहेत –
“सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील हे नक्की आहे. बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं, पण यानंतर ते आपल्याला शिवसैनिक म्हणू शकणार नाहीत. दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही,” असं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलं आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले –
एकनाथ शिंदेंना याबद्दल विचारण्यात आलं असता ते टोला लगावत म्हणाले “ते स्वप्नं पाहत असतात, त्यांना स्वप्नातच राहू द्या. राज्यामध्ये १६६ लोकांचं सरकार आहे. लोकसभेतही १२ खासदारांनी अध्यक्षांना पत्र दिलं आहे. दोन्ही सभागृहात आमच्याकडे बहुमत असून सरकार मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या”.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं “ओबीसी समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित होतं, त्यामुळे मी तीन-चार वेळा दिल्लीला गेलो होतो. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञ, वकील, वरिष्ठ विधिज्ञ यांच्या बैठका घेतल्या. त्यातून या राज्यातील ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम सरकारने केलं आहे. याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचेही आभार मानले आहेत”.
“लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल”
“लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मी आणि फडणवीसांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, पेट्रोल-डिझेल स्वस्त केलं, दुष्काळग्रस्त भागात पाणी वळण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतही अनेक निर्णय घेण्यात आले. राज्याच्या हिताचे अनेक प्रकल्प पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकार अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सरकाचं काम आम्ही कुठे थांबू दिलेलं नाही. जनतेच्या हितामध्ये कोणतीही बाधा येणार नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
ज्य़ेष्ठ नेते लिलाधर डाकेंची भेट
“शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांची ही सदिच्छा भेट होती. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस कऱण्यासाठी आलो होतो. शिवसेना वाढवण्यात त्यांचं मोठं योगदान असून, ते मी जवळून पाहिलं आहे. बाळासाहेबांसोबत सुरुवातीपासून जे नेते होते त्यामध्ये लिलाधर डाकेदेखील होते. आनंद दिघे आणि त्यांचे जवळचे संबंध होते. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिवसेना वाढवण्याचं काम केलं. शिवसेनेच्या वाढीत त्यांच्यासारख्या नेत्यांचं फार मोठं योगदान आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
पाहा व्हिडीओ –
“मंत्रीपद मिळूनही त्यांची राहणी अगदी साधी असून, स्वत:साठी काही निर्माण केलं नाही. पण जे केलं ते शिवसेना या चार अक्षरांसाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी काम केलं. अशा सर्व नेत्यांमुळे, कार्यकर्त्यांमुळे बाळासाहेबांची शिवसेना पुढे गेली आहे. एक ज्येष्ठ नेते म्हणून कार्यकर्त्याच्या रुपाने त्यांना भेटण्यासाठी आलो होतो,” असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
मनोहर जोशींची भेट घेणार का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेसाठी फार मोठं योगदान असणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार आहे. यांच्या अनुभवाचा राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्यांच्या हितासाठी जितका उपयोग करुन घेता येईल तितका करुन घेणार”.