वाई: महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले देशाला लाभलेले वरदान आहेत. स्त्री स्वातंत्र्य हा शब्दही माहीत नसलेल्या काळात त्यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती केली. सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजासाठी ऊर्जादायी आहे, अशा शब्दांत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा १९३ वा जयंती सोहळा महाराष्ट्र शासन व सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने नायगाव( ता . खंडाळा) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री, सातारा व ठाणे जिल्हा शंभूराज देसाई, गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रुपाली चाकणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेही वाचा >>> “देव धर्माच्या नावावर राजकारणाचा बाजार…”, जितेंद्र आव्हाडांच्या ‘राम मांसाहारी’ वक्तव्यावर रोहित पवारांची टीका
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या स्त्री शिक्षणाचे चैतन्य आहेत. या ठिकाणी वर्षभर येऊन लोकांनी येऊन सामाजिक परिवर्तनासाठी ऊर्जा घ्यावी. फुले दाम्पत्य हा आपला अभिमान आहे, असे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांच्या कार्याचे स्मरण पुढच्या हजारो पिढयांना राहावे यासाठी त्यांचे भिडे वाडयात मोठे स्मारक उभे करण्यात येत आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी समाज व्यवस्थेतील अंधश्रद्धा, अनिष्ठ प्रथा यांच्यावर प्रहार करताना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महात्मा फुले यांच्या खांद्याला खांदा लावून लढल्या, असे सांगून नायगाव येथील त्यांच्या स्मारकासाठी हरी नरके यांनी दिलेल्या योगदानाची आठवण केली. शालेय मुलींच्या उपस्थिती भत्त्याचा ठराव ३२ वर्षांपूर्वी केला होता. त्यामध्ये वाढ होण्याची आवश्यकता व्यक्त केली.