सातारा: महाविकास आघाडीकडे निवडून येण्याआधी सर्वजण मुख्यमंत्रिपदासाठी भांडत आहेत. त्यांचे पाय एकमेकांमध्येच अडकणार आहेत आणि त्यातूनच त्यांचा पराभव होणार आहे. ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे. बाळासाहेबांचे विचार त्यागलेली आघाडी आहे. स्वार्थासाठी झालेली आघाडी असल्याने बिघाडी तर होणारच, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे बोलताना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यातील दरे (ता महाबळेश्वर) या त्यांच्या गावी आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ आली, तरी विरोधक मुख्यमंत्रिपद आणि जागावाटपामध्ये अडकले आहेत. त्यांना त्यांचा पराभव समोर दिसायला लागला आहे. पराभव दिसू लागला, की मग दुसऱ्यांच्या त्रुटी शोधायला सुरुवात होते. त्यामुळे ते मतदारयादीमध्ये घोळ, महायुतीच्या विकासकामांमध्ये त्रुटी शोधत आहेत. महायुतीची सत्ता येणार असल्याने मुख्यमंत्री नव्हे, तर विरोधकांनी विरोधी पक्षनेता ठरवावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा >>>Sushma Andhare on Election : पुण्यात नवी कार्यालये, बैठकांनाही जोर; सुषमा अंधारे निवडणूक लढवणार का? म्हणाल्या, “माझी अपेक्षा…”

शरद पवार मोठे नेते आहेत. त्यांच्या पक्षात जयंत पाटील आता पुढे पुढे करत आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि पवार कुटुंबीयांना ते पचनी पडताना दिसेलच असे नाही. त्यामुळे या विषयी जास्त न बोललेले बरे. वेळ आल्यानंतर बऱ्याच गोष्टी समोर येतील, अशी टिप्पणी करत मुख्यमंत्री म्हणाले, की महायुतीची जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आमच्यात कोणताही वाद नाही. आम्ही निवडून येण्याला प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. कुणाला किती जागा हे ठरवले जाईल. मागील दोन वर्षांमध्ये ४६ हजार कोटींच्या विविध योजना बळीराजासाठी केल्या आहेत. ‘लाडकी बहीण’ ही यशस्वी झालेली योजना आहे. अनेक योजना या सरकारने सुरू केल्या आहेत. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातील जनता देईल, असा आम्हाला विश्वास आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde statement regarding mahavikas aghadi defeat amy