मुंबईसह ठाणे जिल्हा आणि संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या काही दिवसांत याठिकाणी पावासाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोमवार दुपारपासूनच या भागामध्ये पावसाचा जोर सुरू झाला असून मंगळवार सकाळपासून जोरदार पाऊस कायम आहे. मुंबई, ठाण्यासहीत कोकणामधील काही भागांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. देशाच्या पश्चिम किनारपट्टी भागांत जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलीय.
याच पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षास भेट दिली. यावेळी त्यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. खरंतर, मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे शहरात पडणाऱ्या पावसाच्या सद्यस्थितीवरती पूर्णपणे लक्ष ठेवण्यात येते. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे आज मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतला, याबाबतची माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली.
यावेळी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, महापालिका अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, आशिष शर्मा, डॉ. संजीव कुमार, पी. वेलारासू, आपत्कालीन संचालक महेश नार्वेकर, प्रमुख अधिकारी संगीता लोखंडे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
भारतीय हवामान खात्याकडून ( IMD) राज्यात पुढील ४ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांत मुसळधार ते अतिमुसळधार (६४ मिमी ते २०० मिमी ) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई, पालघर, रायगड, महाड, ठाणे, रत्नागिरी, चिपळून याठिकाणी एनडीआरएफची एकूण ९ पथकं तैनात करण्यात आली आहे.