लोकसत्ता प्रतिनिधी
सोलापूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांचा गट भाजपबरोबर सत्तेत घेतलेला सहभाग आणि पाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सलित शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची लटकलेली तलवार, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांनी अक्कलकोटमध्ये धाव घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचा धावा केला. त्याचबरोबर तेथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात शेकडो भाविकांना महाप्रसाद देताना लताताईंनी स्वतः वाढती बनून सेवा केली.
राज्याच्या राजकारणात सत्ताधारी भाजपशी मुख्यमंत्री शिंदे यांचा अलिकडे सुप्त संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हेच अधिक लोकप्रिय असल्याचा दावा करणारी पानभर जाहिरात प्रमुख वृत्तपत्रांमध्ये प्रसिध्द झाल्यानंतर उभयतांमधील सुप्त संघर्ष चर्चेचा विषय झाला असतानाच अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडून अजित पवार हे भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाले. त्यापाठोपाठ इकडे विधानसभा सभापती राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाच्या १६ आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे शिंदे गट तणावाखाली असल्याचे बोलले जात असतानाच शिंदे यांच्या पत्नी लताताई शिंदे यांनी अक्कलकोटमध्ये धाव घेऊन श्री स्वामी समर्थ महाराजांच धावा केला. योगायोगाने याचवेळी त्यांचा वाढदिवसही होता.
आणखी वाचा-फडणवीसांबाबत कलंक हा शब्द प्रयोग योग्यच, कॉंग्रेस नेते अतुल लोंढे स्पष्टच बोलले
वटवृक्ष श्री स्वामी महाराज मंदिरात दर्शन घेऊन लताताई शिंदे यांनी जवळच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात जाऊन सेवा केली. सामान्य सेवेकरी बनून स्वामी भक्तांना महाप्रसाद देण्यासाठी वाढपीचे काम केले. हातात भाजी आणि भाताचे भांडे घेऊन भक्तांना आग्रहपूर्वक महाप्रसाद वाढला. त्यानंतर शेवटी लताताईंनी आपल्या कुटुंब सदस्स व नातलगांसह इतर भाविकांसमवेत रांगेत बसून महाप्रसाद ग्रहण केला. आपणांस मुख्यमंत्र्यांच्या अर्धांगिनी स्वतः महाप्रसाद वाटप करीत असल्याचे कळले तेव्हा भाविकांना सुखद धक्का बसला.
अर्थात, यावेळी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे पदाधिकारीही लताताईंच्या स्वागतासाठी धावून आले. मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेंजयराजे भोसले व प्रमुख कार्यकारी विश्वस्त आमोलराजे भोसले यांच्या देखरेखीखाली सुरू असलेली स्वामी सेवा पाहून लताताई प्रभावित झाल्या. मंडळाचे सचिव शाम मोरे यांनी श्री स्वामी समर्थ प्रतिमा, कृपावस्त्र देऊन लताताईंचा सन्मान केला.