युट्यूबर आणि ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. एल्विश रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करत असून तिथे येणाऱ्या लोकांना तो सापाचे विष आणि परदेशी तरुणी पुरवत असल्याचा त्याच्यावर आरोप करण्यात आला आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी ‘वर्षा’वर गणेशोत्सवानिमित्त एल्विश यादव हजर होता. त्याच्या हस्ते गणरायाची आरतीही करण्यात आली. त्यामुळे या कार्यक्रमाचे फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले जात आहेत.

संजय राऊतांनी काय आरोप केला होता?

“एल्विश यादव मुख्यमंत्र्यांच्या घरी जातो. त्याला त्यांच्या गटातील एक खासदार घेऊन जातो. तो खासदार स्वत: ड्रग्जचं सेवन करतो. या व्यक्तीला वर्षा बंगल्यावर कुणी आमंत्रित केलं होतं? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्याचा काय संबंध आहे?” असे सवाल संजय राऊतांनी उपस्थित केले आहेत.

हेही वाचा >> “ड्रग्ज घेणाऱ्या आमदारांची माहिती माझ्याकडे”, राऊतांच्या विधानाला शिंदे गटातील नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाले…

मुख्यमंत्र्यांचा पलटवार काय?

संजय राऊतांच्या या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधकांना कामं काय आहेत? आम्ही कामं करतो, विरोधकांना काही काम उरलंय का? रोज आरोप करणं हेच विरोधकांना काम आहे. आम्ही कामातून उत्तर देतोय. त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प सुरू करतोय. तुम्ही इगो ठेवून अनेक कामे बंद केली होती, असे राज्यकर्ते नसतात. अहंकारी वृत्तीने राज्य चालत नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. रोज सकाळी उठलं की त्यांना तेच काम आहे. रोज सकाळी उठलो की आम्ही कामं करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा >> “रेव्ह पार्टीला ड्रग्ज पुरवल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेला एल्विश मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर…”, ठाकरे गटाची टीका

मुख्यमंत्री आज साताऱ्यात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज साताऱ्यातील दरे तांब येथे त्यांच्या गावी गेले आहेत. तेथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या त्यांचा कोणताही कार्यक्रम, बैठका, भेटी आदी कार्यक्रम अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र सातारा जिल्ह्यात पर्यटनाला मोठा वाव असून त्यादृष्टीने ते अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. याचबरोबर बांबू लागवड प्रकल्पासह स्कुबा डायव्हिंग प्रकल्पाचा ते आढावा घेणार आहेत.

एल्विश यादवला अटक होणार का?

उत्तर प्रदेशमधल्या नोएडा शहरातील सेक्टर ४९ पोलीस ठाण्यात एल्विशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात इतर पाच जणांना अटक झाली आहे. तसेच याप्रकरणी एल्विशला अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shindes first reaction on the elvish yadav case replying to the opposition sgk