“नागरीकरणाला पूर्वी अभिशाप सजमला जायचा. परंतु, शहरात शिक्षण, आरोग्य, रोजगार तयार होत गेले. त्यामुळे शहरीकरण झपाट्याने वाढत गेले”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज म्हणाले. ते नगरविकास दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी नगरविकासासाठी यंदा रेकॉर्डब्रेक निधी दिला असल्याचाही दावा केला आहे. तसंच, विकास आराखडा तयार केला तरी त्याची अंमलबजावणी गरेजचं असतं असं नमूद करताना त्यांनी काही महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कार्यावरही बोट ठेवलं आहे.
“मी मुख्यमंत्री असताना नगरविकास खातं माझ्याकडे होतं. महाविकास आघाडीच्या काळात ते खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे गेलं. त्यानंतर आता तेच मुख्यमंत्रीही आहेत. त्यांनी नगरविकास खात्यात चांगलं लक्ष घातलं आहे. शहरांमध्ये विकास आराखडे वेगाने मंजूर केले. काही वर्षांपूर्वी एकूण विकासाच्या प्रक्रियेत शहाराचा विकास आराखडा आणि विकास यात कोणताही संबंध नव्हतं. परंतु, आता मंजूर झालेल्या विकास आराखड्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्य आणि केंद्राच्या संकल्पनेतून घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिशय वेगाने सुरू आहे”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा >> “…अन्यथा सभेत घुसणार”, गुलाबराव पाटलांच्या आव्हानाला संजय राऊतांचं प्रतिआव्हान; म्हणाले, “घुसा आणि…”
“मुख्यमंत्र्यांनी गेल्यावर्षी नगरविकास विभागात रेकॉर्ड निधी दिला. म्हणजेच आजपर्यंतचा सर्वात जास्त निधी. आज निधीची कमतरता नाही, पण कल्पकता आणि अंमलबजावणीची गरज आहे. मोठ्या प्रमाणात पैसा देण्यात येतो, पण तीन-चार वर्षे पैसा वापरला जात नाही. काही नगरपालिका, महानगरपालिका निधी मिळाल्यानंतर निविदाही काढत नाही. त्यामुळे यामध्ये पारदर्शिता आणण्याकरता निर्णय घ्यावा लागेल”, असंही पुढे फडणवीसांनी स्पष्ट केलं.