मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सातबाराचा उतारा मिळाला पण, जमीन काही मिळाली नाही. आता जमिनीसाठी याचना करण्याची वेळ उंदीरगाव येथील एका खंडकरी शेतकरी महिलेवर व तिच्या वारसांवर आली आहे. या प्रकारामुळे पालकमंत्री बबनराव पाचपुते हेदेखील अवाक झाले.पन्नास वर्षे रस्त्यावरची लढाई व न्यायालयीन संघर्ष केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार खंडकऱ्यांना जमीनवाटपाची प्रक्रिया सुरू आहे. दिवाळीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह नगर जिल्ह्यातील आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार बाळासाहेब विखे, माजी आमदार जयंत ससाणे, भानुदास मुरकुटे, माजी मंत्री शंकरराव कोल्हे या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत जमीनवाटपाचा शुभारंभ मोठय़ा धूमधडाक्यात करण्यात आला. या वेळी हरेगाव, उंदीरगाव व माळवाडगाव येथील प्रातिनिधिक स्वरूपात ११ शेतकऱ्यांना जमिनीच्या सातबाराचे उतारे मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते देण्यात आले. त्यामध्ये उंदीरगाव येथील सुमनबाई बहिरनाथ गाडेकर या महिलेचा समावेश होता. या महिलेला सातबारा मिळाला तरी ताबा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे ही महिला आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. तीन एकर जमीन मिळण्याऐवजी केवळ कागद हाती पडला. आता ‘जमीन देता का जमीन’ अशी विनवणी या महिलेसह तिचे वारसदार नेत्यांची विनवणी करत आहेत.
राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत आज सरकारी विश्रामगृहावर खंडकरी शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीला अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, प्रांताधिकारी सुहास मापारी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या वेळी सुमनबाई गाडेकर यांचा मुलगा सुभाष बहिरूनाथ गाडेकर यांनी मला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उतारा मिळाला, पण जमीन मिळाली नाही अशी तक्रार केली. हे ऐकून पाचपुते अवाक झाले. त्यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी जगताप यांच्याकडे विचारणा केली. त्यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. कार्यक्रमाच्या वेळी घाई झाली होती. ज्या खंडकऱ्यांच्या जमिनी वाटपाला आहेत, त्यांचे उतारे तयार करून ते देण्यात आले. त्या वेळी मोजणी झालेली नव्हती. मोजणीच्या वेळी अतिक्रमणे आढळून आली. ती काढण्याचे काम सुरू आहे. गाडेकर यांना लवकरच जमीन दिली जाईल, असे सांगण्यात आले. हरेगाव मळय़ाचे वाटप अंतिम टप्प्यात आहे. पण अद्यापही अनेकांना जमिनीच मिळालेल्या नाहीत. काही वारसांची नावे चुकीची लागली आहेत. ज्यांना जमिनीचा ताबा दिला त्यांच्या जमिनीत काही वेगळेच लोक घुसले आहेत, अशा एक ना अनेक तक्रारींचा पाढा बैठकीत वाचण्यात आला.
पाचपुते यांनी लवकरच खंडकऱ्यांच्या प्रश्नावर मुंबईत बैठक घेण्याचे जाहीर केले. तसेच पुढील महिन्यात पुन्हा एकदा शहरात बैठक घेऊन सर्व तक्रारी मार्गी लावण्याचे जाहीर केले. माजी खासदार बाळासाहेब विखे यांनीही जमीनवाटपातील गोंधळाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वारंवार पत्र लिहून गोंधळाकडे तसेच भूखंडमाफियांच्या हस्तक्षेपाबद्दल जाहीर टीका केली होती.
मुख्यमंत्र्याच्या हस्ते सातबारा, तरीही जमिनीचा ताबा नाही
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सातबाराचा उतारा मिळाला पण, जमीन काही मिळाली नाही. आता जमिनीसाठी याचना करण्याची वेळ उंदीरगाव येथील एका खंडकरी शेतकरी महिलेवर व तिच्या वारसांवर आली आहे. या प्रकारामुळे पालकमंत्री बबनराव पाचपुते हेदेखील अवाक झाले.पन्नास वर्षे रस्त्यावरची लढाई व न्यायालयीन संघर्ष केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार खंडकऱ्यांना जमीनवाटपाची प्रक्रिया सुरू आहे.
First published on: 28-05-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister hands over satbara extract but no land in control