यवतमाळ विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची नाराजी दूर करण्यासाठी आणि काँग्रेस उमेदवार नंदिनी पारवेकर यांच्या विजयासाठी खुद्द मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते आमदार संदीप बाजोरिया यांच्याशी मुंबईत वर्षां बंगल्यावर चर्चा करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील तिढा दूर करण्यात यश मिळवले आहे. काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करून त्यांना निवडून आणण्याची काँग्रेसएवढीच आपली जबाबदारी असून, ती आम्ही पार पाडू, अशी खात्री राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी दिल्यामुळे सध्या तरी काँग्रेसमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हय़ातील तालुका व जिल्हास्तरावरील विविध समित्यांच्या स्थापनेत काँग्रेस खोडा घालीत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळावरील नियुक्त्यांच्या शासन निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी स्थगनादेश दिलेला आहे व त्यावरून राष्ट्रवादीत असंतोष आहे. हा स्थगनादेश उठविण्यात यावा व सिंचन विहिरींच्या वाटपासंदर्भात राष्ट्रवादीवर झालेल्या अन्यायाचे निवारण करावे, असे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर आमदार बाजोरिया यांनी मांडले. या सर्वाचे निराकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी कबूल करून काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीचा धर्म पाळून काँग्रेसच्या नंदिनी पारवेकर यांना निवडून आणण्यासाठी एकत्र काम करू या, असे आवाहन केले. मुख्यमंत्र्यांसोबत आपली झालेली चर्चा अतिशय समाधानकारक असून नंदिनी पारवेकरांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्व स्थानिक नेते आणि कार्यकत्रे जोमाने काम करतील, असे आ. संदीप बाजोरिया यांनी शुक्रवारी सांगितले. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चच्रेच्या वेळी अमरावती जिल्हय़ातील तिवसाच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर हजर असल्याचेही आमदार बाजोरिया यांनी स्पष्ट केले. काही अटी काँग्रेसने मान्य केल्यावरच आणि स्वत: मुख्यमंत्र्यांनी प्रश्न समजावून घेतल्यानंतरच राष्ट्रवादी  निवडणूक प्रचारात उतरणार असल्याचे राष्ट्रवादीने म्हटले होते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत तिढा निर्माण झाला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन तिढा सोडवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काँग्रेस-राष्ट्रवादी समन्वय बठक
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शुक्रवारी राकाँ नेत्यांशी संपर्क साधून दोघांची एक समन्वय बठक घेतली. काँग्रेसचे आमदार वामनराव कासावार यांच्या बंगल्याजवळीत प्रचार कार्यालयात ही बठक झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांच्यासह निवडणूक प्रमुख असलेले सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा अध्यक्ष आमदार कासावार, विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, जिल्हा सरचिटणीस अशोक बोबडे, तसेच राकाँचे आमदार संदीप बाजोरिया, सुरेश लोणकर, प्रवीण देशमुख, नानाभाऊ गाडबले, सुभाष ठोकळ, सुरेश चिंचोळकर असे दोन्ही पक्षांचे नेते या बठकीला हजर होते.