पश्चिम महाराष्ट्रात गारपीट व अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या सोलापूर जिल्हय़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी धावती भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. ग्रामीण भागातील कच्च्या वाटेत प्रवास करताना त्यांना बैलगाडीचा आधार घ्यावा लागला. त्यांच्यासमवेत पुनवर्सन खात्याचे मंत्री डॉ. पतंगराव कदम व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले होते.
गेल्या आठवडय़ात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या सांगोला तालुक्यातील घेरडी व परिसरास भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची विचारपूस केली होती. सांगोला हा राष्ट्रवादीच्या माढा लोकसभा मतदारसंघातील भाग आहे. पवार यांनी गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या प्रभावित भागाचा दौरा केला असताना मुख्यमंत्री चव्हाण यांनीही पवार यांचीच री ओढत आपल्या काँग्रेसची ताकद असलेल्या भागात जाऊन नुकसानीची पाहणी केल्याचे दिसून आले. सोलापूरनंतर मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबाद जिल्हय़ातील काँग्रेस प्रभावित तुळजापूर व अन्य भागांतील नुकसानीची पाहणी केली.
सकाळी विमानाने मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी स्वागत टाळून लगेचच विमानतळापासून जवळच असलेल्या होटगी व काझी कणबस येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. हा परिसर दक्षिण सोलापूर तालुक्यातील असून येथून काँग्रेसचे आमदार दिलीप माने हे प्रतिनिधित्व करतात. होटगी येथे काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार गुरुनाथ पाटील यांच्या शेतास भेट देऊन मुख्यमंत्री चव्हाण यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागेची पाहणी केली. नंतर काझी कणबस येथील नुकसानीची पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी नुकसानीची माहिती दिली. तर स्थानिक शेतकऱ्यांनी व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मदत लवकरात लवकर मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदने सादर केली. या वेळी आमदार दिलीप माने व सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके आदी उपस्थित होते.

Story img Loader