गारपीटग्रस्त भागातील नुकसानीच्या पाहणीसाठी उशिराने मराठवाडय़ात दाखल झालेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या दौऱ्यात काँग्रेसच्या मतदारसंघाची आवर्जुन निवड केल्याचे चित्र होते. दुग्ध विकासमंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार बसवराज पाटील यांच्या मतदारसंघातील गावात ते मंगळवारी होते. दरम्यान, या दौऱ्यात सहभागी व्हायचे की नाही, यावरून सरकारी कर्मचा-यांमध्ये मंगळवारी कमालीचा संभ्रम होता.
गारपिटीमुळे नक्की किती नुकसान झाले, त्याची व्याप्ती किती हे पाहण्यासाठी मुख्यमंत्री का आले नाहीत, अशी विचारणा विरोधकांकडून सुरू झाल्यानंतर मंगळवारी मुख्यमंत्री चव्हाण सोलापूरमाग्रे उस्मानाबादेत दाखल झाले. तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ व भातंब्रा या गावांना त्यांनी भेट दिली. पुढे याच मार्गावरील औसा तालुक्यात पाहणी केली. हे दोन्ही मतदारसंघ काँग्रेसचे आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दौरा पूर्वी जाहीर झाला होता. तो पूर्णपणे राजकीय होता. त्यांनी बीड जिल्ह्य़ातील सभा रद्द करून गारपीटग्रस्त भागात पाहणी केली. राष्ट्रवादीच्याच कोणत्या नेत्यांना बळ दिल्याचे संकेत दौऱ्यातून मिळतील, हे जाणून त्यांची पाहणी झाली. दौऱ्यातील नेहमीच्या पद्धतीप्रमाणे कोणाकडे जेवण, कोणाच्या घरी नाश्ता हेदेखील ठरवून चालले होते.
काँग्रेस आघाडीतील नेतेच नाहीत, तर शिवसेना-भाजप नेत्यांनीही हा शिरस्ता पाळला. बीडच्या दौऱ्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी लातूरचा दौरा केला. शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी परभणीत गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. हिंगोलीत झालेले नुकसान मोठे आहे, पण तेथे पाहणीसाठी अजून तरी कोणी गेले नाही. आमदार राजीव सातव यांनी काही गावांना भेटी दिल्या.

Story img Loader