यंदा भारताने आपला ७४ वा प्रजासत्ताकदिन साजरा केला. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वजजण प्रजासत्ताक दिन साजरा करत होते. शाळा, महाविद्यालयांपासून ते दिल्लीतील कर्तव्यपथांवर दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम झाले. दरम्यान, राज्यातील एका शाळेतील विद्यार्थ्याने आपल्या भाषणाद्वारे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. कार्तिक वजीर असं नाव असणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकशाहीची व्याख्या ज्याप्रकारे आपल्या भाषणातून सांगितली, त्यानंतर हा मुलगा प्रचंड प्रसिद्ध झाला. त्याचा भाषणाचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. एवढच नाही तर सर्वसामान्यांपासून ते थेट राजकीय मंडळी आणि मुख्यमंत्र्यांनीही त्याचे कौतुक केले आहे.
प्रजासत्ताकदिनी ‘लोकशाही’ विषयावर शाळेत केलेल्या अनोख्या भाषणामुळे प्रसिद्ध झालेल्या कार्तिक वजीर या विद्यार्थ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाटूर येथे भेट घेऊन त्याचे कौतुक केले. रेवलगाव (ता.अंबड जि. जालना) येथील जिल्हा परिषद शाळेत कार्तिक शिक्षण घेत आहे.
या अगोदर राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश टोपे यांनीही कार्तिकला आपल्या घरी बोलावून त्याचं भाषण ऐकलं होतं आणि कौतुकही केलं होतं.
कार्तिक भाषणात नेमकं काय म्हणाला आहे?
आपल्या भाषणात हा विद्यार्थी त्याच्या संवैधानिक हक्काचं कसं आणि कोणाकडून उल्लंघन केलं जातं, हे सांगताना दिसत आहे. तो आपल्या भाषणात म्हणतो की, खरंतर आज लोकशाही दिन आहे. आजपासून लोकशाही सुरू झाली. मला लोकशाही खूप आवडते, कारण लोकशाहीमध्ये तुम्ही काहीही करु शकता. प्रेमाने राहू शकता, भांडू शकता, पण मला मोक्कार धिंगाणा करायला, माकडासारखे झाडावर उड्या मारायला, फिरायला खूप आवडते. माझे बाबा मला कधीही मारत नाहीत, कारण ते लोकशाही मानतात. मात्र, माझ्या गावातील लहान मुलं माझं नावं सरांना सांगतात आणि दहशतवादी जशी लोकशाही पायदळी तुडवतात तसे सर मला पायदळी तुडवतात.”
एवढंच नाही तर भाषणाच्या शेवटी हा विद्यार्थी म्हणतो, “माझ्यासारखा गरीब मुलगा आख्या तालुक्यात आढळणार नाही.” या मुलाच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.