बीड : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीदिनी उद्या (शुक्रवारी) मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह राज्यभरातील मान्यवर, मुंडे प्रेमी गोपीनाथगड येथे उपस्थित राहणार आहेत. कोविडमुळे दोन वर्ष जाहीर कार्यक्रम झालेला नसल्याने शुक्रवारी होणाऱ्या पुण्यतिथी कार्यक्रमास मोठी गर्दी गडावर होणार आहे.

बीड जिल्ह्यातील पांगरी (ता.परळी) येथील दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथगड समाधीस्थळी शुक्रवारी स्मृतिदिनानिमित्त रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे  कीर्तन होणार आहे. समाजातील वंचित, पीडित घटकांसाठी काम करणाऱ्या व्यक्तींसह संस्थांचा या वेळी सन्मान करण्यात येणार आहे. गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करण्यासाठी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह राज्यातील मान्यवर नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंडे प्रेमी गोपीनाथगडावर दाखल होत असून शुक्रवारी होणाऱ्या गर्दीच्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने त्या भागात जड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. गोपीनाथगड येथे दरवर्षी गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम होतात. मात्र, गेल्या दोन वर्षांत करोना महामारीमुळे जाहीर कार्यक्रम झालेला नाही. यावर्षी करोनाची लाट ओसरल्याने राज्यभरातील मुंडे प्रेमी हजारोंच्या संख्येने गडावर दाखल होणार आहेत. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्यासह सर्व पक्षीय नेते उपस्थित राहणार असून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे लक्ष

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी समाजमाध्यमावर लोकनेते गोपीनाथ मुंडेंचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथगडाचे छायाचित्र प्रसारित करून संघर्ष दिनाच्या ओळी लिहून आठव्या पुण्यतिथीनिमित्त ३ जून रोजी सकाळी १० वाजता गोपीनाथगडावर ‘मी आपल्या प्रतीक्षेत’ असल्याचा मजकूर प्रसारित केला आहे. या माध्यमातून पंकजा मुंडेंनी मुंडे प्रेमींना गडावर येण्याचे आवाहन केले आहे. दोन वर्षांनंतर गडावर होणाऱ्या जाहीर कार्यक्रमातून पंकजा मुंडे सद्य परिस्थितीवर काय बोलतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Story img Loader