आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. डॉ. तांबे यांच्या निधनामुळे आयुर्वेद आणि रोजच्या जगण्यात आहार-विहार आणि विचारांच्या संतुलनाबाबत मार्गदर्शन करणारे आरोग्यपूजक व्यक्तिमत्व काळाने हिरावून नेले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आयुर्वेद आणि योगाच्या माध्यमातून अनेकांच्या जीवनात आरोग्यदायी बदल घडवण्याचा डॉ. बालाजी तांबे यांनी ध्यास घेतला होता. त्यांची दर्जेदार औषध निर्मितीतून त्यांनी आयुर्वेदाचा देश, विदेशातही प्रसार केला. आहार, विहार आणि विचार यांच्या संतुलनातच आरोग्याची गुरुकिल्ली आहे, हा संदेश त्यांनी सहज, सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचवला. अध्यात्माची आणि आरोग्याची सांगड घालण्यामुळे अनेकांनी त्यांना आपल्या जीवनात गुरूचे स्थान दिले. आयुर्वेदाबाबतचा डोळस दृष्टीकोन निर्माण करण्यात आणि नव्या पिढीत त्याबाबतची गोडी निर्माण करण्यात डॉ. तांबे यांचे मोलाचे योगदान राहीले आहे. त्यांचे हे योगदान सदैव स्मरणात राहील.”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  शोक संदेशात म्हटलं आहे.

बालाजी तांबे यांनी लिहिलेली पुस्तके

– आत्मरामायण (गुजराती भाषेत)
– आयुर्वेद उवाच. भाग १, २.(मराठी)
– आयुर्वेदीय गर्भसंस्कार (मराठी, गुजराती, इंग्रजी)
– आयुर्वेदिक घरगुती औषधे (मराठी व इंग्रजी)
– चक्र सुदर्शन (मराठी)
– मंत्र आरोग्याचा
– मंत्र जीवनाचा
– वातव्याधी
– श्री गीता योग – शोध ब्रह्मविद्येचा (इंग्रजीत Peacock Feathers) (१८ भाग). (प्रकाशनाधीन)
– श्री रामविश्वपंचायतन (मराठी)
– संतुलन क्रियायोग (मराठी)
– स्त्रीआरोग्य
– स्वास्थ्याचे २१ मंत्र. (भाग एकाहून अधिक.)

बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी त्यांनी एकाच वर्षी मिळवली होती. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केलं होतं. त्यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झालं आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister uddhav thackeray expressed grief over the demise of balaji tambe rmt