मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाकाळात घरात राहूनच राज्यकारभार करत आहेत. ते घराबाहेर पडतच नाहीत, अशी टीका मुख्यमंत्र्यांवर सातत्याने विरोधकांकडून होत आहे. विरोधकांच्या याच टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, “विरोधक सातत्याने माझ्यावर घराबाहेर पडत नाही, घरातून कारभार करत आहेत म्हणून टीका करतायत. त्यांना मला सांगायचं आहे की, घरातून काम करतोय तर एवढं काम होतंय, मग बाहेर पडलो तर विचार करा किती काम होईल.”
करोनाच्या पार्श्वभूमीवर आपण लोकांना घरात राहायला सांगत आहोत आणि स्वतःच घराबाहेर पडायचं हे पटत नसल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं. ते म्हणाले, “करोनाच्या प्रादुर्भावामुळे मी सातत्याने जनतेला आवाहन करत आहे की, घरातून बाहेर पडू नका, घरातच राहा आणि मीच घराबाहेर पडतोय हे मला बरोबर वाटत नाही. पण मी लवकरच बाहेर पडणार आहे.”
शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. ”अनेकांच्या पोटात दुखतंय. पण शिवसेना त्यांना औषध देतेय. मी अनेकांचं अंतर्मन पाहिलं आहे. त्यामुळे अनुभवाचं गाठोडं घेऊन पुढे जात आहे. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत. आपण पण स्वबळाचा नारा देऊ. न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. अन्याय होतोय आणि न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ नाही. तलवार उचलण्याची हिम्मत नाही. आधी तलवार उचलण्याची ताकद तर कमव. मग वार कर. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात जातात. हार जीत होत असते. कुणी हरतं, कुणी जिंकतं. जिंकलं तर आनंद आहे. पण हरल्यानंतरसुद्धा पराभूत मानसिकता घात करते”, असा टोमणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला मारला.