सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची विशेष पथकामार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरून अधिवेशनाचा पहिला आठवडा कामकाजाविनाच गेल्याने, उर्वरित अंतिम आठवडय़ात तरी कामकाज सुरळित व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनाच पुढाकार घ्यावा लागणार असे दिसत आहे. या आरोपांच्या विशेष पथकामार्फत अथवा न्यायालयीन चौकशीस राष्ट्रवादीचा विरोध असला तरी सभागृहाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी विरोधकांना आणि राष्ट्रवादीला मान्य होईल अशा चौकशीचा तोडगा काढण्यात मुख्यमंत्र्यांच्या राजकीय कौशल्याची कसोटी लागणार आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवडय़ात उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीची कोंडी करण्याची विरोधकांची त्यातही भाजपाची रणनीती यशस्वी ठरली. मात्र अविश्वास प्रस्तावाच्या मुद्यावरून विरोधकांमधील ऐक्याचा बेबनावही उघड झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची घेतलेली शपथ वैध की अवैध, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विरोधकांना दिलेले आव्हान आणि सिंचन घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशीची मागणी आदी मुद्यावरून अधिवेशनात पहिल्या आठवडय़ात कोणत्याही प्रश्नावर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे गेल्या वर्षीच्या दोन हजार कोटींच्या पॅकेजप्रमाणे या वेळीही काहीतरी मिळेल या आशेने विधिमंडळाकडे डोळे लावून बसलेल्या मराठवाडा-विदर्भवासीयांची निराशाच झाली.
सिंचनाच्या मुद्यावर श्वेतपत्रिकेनंतर आता कोणत्याही दुसऱ्या चौकशीचे भूत नको अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली असून विरोधक मात्र चौकशीच्या मुद्यावर अडून आहेत.
सिंचन घोटाळ्याच्या चौकशीचे प्रकरण न्यायालयात गेले असून त्यावर २० डिसेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतरच सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी स्विकारल्याचे काँग्रेसचे नेते सांगत आहेत. सिंचनक्षमतेच्या नेमक्या आकडेवार केंद्रीय जल आयोगाकडून अथवा निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करून शिक्कामोर्तब करावे असा तोडगा सुचवून विरोधकांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले जातील, असा काँग्रेसच्या सूत्रांचा अंदाज आहे. राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनीही विरोधकांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
मुख्यमंत्री चंद्रपुरात, सचिव गडचिरोलीत
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने गेले आठवडाभर कामकाजात व्यग्र असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज चंद्रपूर जिल्हयातील एका खेडेगावात जाऊन विश्रांती घेत कामाचा शीण घालविला. तर मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांनी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांसह गडचिरोली जिल्हयात विविध ठिकाणी भेटी देऊन लोकांशी संवाद साधला.
सिंचन घोटाळा चौकशीची कोंडी मुख्यमंत्री कशी फोडणार?
सिंचन घोटाळ्याच्या आरोपांची विशेष पथकामार्फत चौकशी करण्याच्या मागणीवरून अधिवेशनाचा पहिला आठवडा कामकाजाविनाच गेल्याने, उर्वरित अंतिम आठवडय़ात तरी कामकाज सुरळित व्हावे यासाठी मुख्यमंत्र्यांनाच पुढाकार घ्यावा लागणार असे दिसत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-12-2012 at 02:49 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister will take strong action on irrigation scam