राष्ट्र्वादी ‘लक्ष्य’ होताना काँग्रेसचे मात्र मौन
थंडीचा मोसम असूनही नागपूरातील थंडी गायब झाली आहे. साहजिकच शहरातील तापमान वाढल्यामुळे उकाडा जाणवत असला तरी या उकाडय़ातही राष्ट्रवादीला मात्र हुडहुडी भरली आहे. उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथेपाटोपाठ सिंचन घोटाळ्यावरून विरोधकांनी हल्लाबोल केल्यामुळे राष्ट्वादीत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. त्यातही काँग्रेसने गप्प बसण्याची भूमिका गेतल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अस्वस्थ झाले असून विरोधक आणि राष्ट्वादीत जुंपल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मात्र निर्धास्त झाल्याचे चित्र दिसत आहे.
सिंचन घोटाळ्याच्या आरोपावरून उपमुख्यमंत्रीपदाचा तडकाफडकी राजीनामा दिलेल अजित पवार मध्यंतरी विजनवासात गेले होते. मात्र श्वतपत्रिकेच्या माध्यमातून मंत्रीमंडळात परतण्याचा त्यांचा मार्ग मोकळा करण्यात आला. मात्र पवार यांनी उपमुख्यंत्रीपदाची घेतलेली शपथच अवैध असल्याचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी दोन दिवस सभागृहाचे कामकाज बंद पाडले. विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींनी त्यातून पवार यांची सोडवणूक केली. त्यामुळे अजितदाद काहींसे निर्धास्त झाले असतानाच भाजपाने पुन्हा एकदा सिंचन घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी लावून धरून अजित पवार यांना सभागृहात बसणेही मुश्किल केले आहे. त्या्मुळे सत्यपत्रिकेच्या माध्यमातून राष्ट्वादीने आज उघडपणे अजितदादांचा भलाभण करीत त्यांना जलक्रांतीचे जनक ठरविण्याचा प्रयत्न केला. मात्र मुख्यमंत्री आणि काँग्रेस या प्रश्नावर मुग गिळून गप्प असल्याने राष्ट्वादीचे नेते अस्वस्थ झाले आहेत. या अधिवेशनात राष्ट्वादी एकाकी पडल्यामुळे खुद्द अजितदादाही अस्वस्थ झाले आहेत.  मात्र मुख्यमंत्री निर्धास्थ असल्याचे चित्र दिसत आहे.
 दोन आठवडय़ाच्या अधिवेशनातील पहिला आठवडा कोणत्याही कामकाजाविना वाया गेल्याने मराठवाडा-विदर्भातील आमदार अस्वस्थ असून काँग्रेसच्या आमदारांनी तर याबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन सभागृहात बोलण्याची विनंती केली. मात्र जे चालले आहे ते योग्य असून त्यात पडू नका, काही दिवस संयम ठेवा अशा सूचना या आमदारांना मुख्यमंत्र्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे सध्या काँग्रेसचे आमदार गप्प बसून असले तरी विदर्भातील प्रश्नावर चर्चा न झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका पक्षालाच बसण्याची भीती काही आमदारांनी व्यक्त केली. या अधिवेशनाचा वेळ वाया गेला तरी राष्ट्वादीवर परिणाम होणार नाही, मात्र आमचे नुकसान असल्याचेही या आमदारांनी सांगितले.