पर्ल्स कंपनीच्या गैरव्यवहाराबद्दल आपण स्वत: मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले होते. त्यांनी या बाबत चौकशी करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना दिल्या होत्या, असे असताना या कंपनीबद्दल कोणाची तक्रार नाही व मला याबाबत माहिती नाही, असे फडणवीस यांचे वक्तव्य आपणास धक्का देणारे आहे, अशी प्रतिक्रिया भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे सातारा जिल्हाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.
संदीप जगताप गेले तीन दिवस पर्ल्स कंपनीच्या गैरव्यवहाराविरोधात उपोषण करत आहेत. त्यांच्या या उपोषणाची दखल औरंगाबाद येथील विधानसभेच्या लोकप्रतिनिधींनी घेतली. विधान सभेत या बाबत तारांकित प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी हात झटकले आहेत. त्यावर बोलताना जगताप यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुख्यमंत्री कराड येथे स्व.यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहण्यासाठी आले असताना मी स्वत त्यांना त्यांच्या नावाचे निवेदन दिले होते. पर्ल्स कंपनीच्या गरव्यवहाराबद्दल माहिती दिली होती. यावर त्यांनी पोलिसांना सूचना आणि या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. सध्या माझ्याकडे या बाबत ८०० तक्रारी असून कोल्हापूर येथेही फसवणूक झाल्याची प्रकरणे बाहेर आली आहेत. या बाबत मुख्यमंत्री मला काही माहीत नाही व तक्रारी नाहीत असे सांगतात याबद्दल मला आश्चर्य वाटल्याचे जगताप म्हणाले. गुरुवारपासून शाहुपुरी पोलीस स्थानकात ज्या गुंतवणूकदारांची फसवणूक झाली त्यांनी तक्रार करावी, असे आवाहनही जगताप यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा