दिवाळीसाठी आई व मामासोबत गावी निघालेल्या दहा वर्षांच्या मुलाचा एसटीच्या दोन बसमध्ये सापडून मृत्यू झाला. स्वारगेट बसस्थानकात रविवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी दोन्ही बसच्या चालकांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे एसटी प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार पुन्हा समोर आला आहे.
अमोल शामु बजंत्री (रा. चऱ्होली, ता. हवेली. मूळगाव- सोलापूर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. बस चालक मधुकर तुकाराम दीक्षित (वय ५०, रा. महावीर कॉलनी, शिरवळ) आणि साहेबराव तुळशीराम शेंडे (वय ५२, रा. म्हाडा कॉलनी, बारामती) यांना अटक करण्यात आली आहे.
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बजंत्री कुटुंबीय हे मूळचे सोलापूर येथील आहे. रविवारी सकाळी अमोल हा आई, मामा व दोन भावंडांसह सोलापूरला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आले होते. फलाट क्रमांक सहा येथे सोलापूर बसची वाट पाहत ते थांबले होते. दिवाळीमुळे स्थानकावर प्रचंड गर्दी होती. जवळच पुणे-बारामती ही बस थांबलेली होती. या बसजवळ अमोल थांबला होता. त्याचवेळी पुणे- विजापूर बस याच फलाटावर लावण्यासाठी चालक ही बस मागे घेत होता. मात्र, चालकाला मार्गदर्शन करण्यासाठी मागे वाहकही नव्हता. अमोलचे या बसकडे लक्ष नव्हते. काही कळायच्या आत बारामतीच्या व मागे येणाऱ्या विजापूर या दोन्ही बसमध्ये अमोल सापडला. नागरिकांनी आरडा-ओरडा केल्यानंतर बस थांबविण्यात आली. यामध्ये अमोल गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू  झाला. या घटनेनंतर नागरिक संप्तत झाले होते. त्यामुळे काही वेळ बसस्थानकात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थती नियंत्रणात आणली.