करोना काळात जो लॉकडाऊन लागला त्यानंतर बालविवाह वाढले आहेत असा दावा रुपाली चाकणकर यांनी केला. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लातूरमध्ये एका कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तिथे त्यांनी हा दावा केला. मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे अनेकांचं अभ्यासावरुनही लक्ष उडालं आहे. मोबाइल फोनमुळे आई-वडील आणि मुलांमधला संवाद संपला आहे असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे रुपाली चाकणकर यांनी?
“आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये संवाद संपला आहे. यामुळेच मुली प्रेमात पडून घरातून पळून जाऊ लागल्या आहेत. करोना काळात प्रादुर्भाव वाढू नये म्हणून लॉकडाऊन लावण्यात आला होता. या काळात महाराष्ट्रात बालविवाह वाढले.” लातूरच्या एका संमेलनात त्यांनी हे मत व्यक्त केलं.
हे पण वाचा- कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरोपीस अटक, कठोर कारवाईची मागणी
लातूरमध्ये रुपाली चाकणकर म्हणाल्या एकटा लातूर जिल्हा असा आहे जिथे ३७ बालविवाह रोखले गेले. महाराष्ट्रात बालविवाहांचं प्रमाण वाढलं आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्या पण त्यांनी ठराविक कुठलीही आकडेवारी सादर केली नाही. गावांमध्ये जेव्हा ग्रामसभा घेतल्या जातात तेव्हा बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजनांवर चर्चा झाली पाहिजे. आई वडिल आणि मुलांमध्ये जो संवाद संपला आहे त्यामुळे अनेकदा मुली घर सोडून जातात असंही समोर आलं आहे. प्रेमात पडतात, घर सोडून पळून जातात असंही रुपाली चाकणकर म्हणाल्या.
हे पण वाचा- किरीट सोमय्यांच्या व्हिडीओची महिला आयोगाकडून दखल, रुपाली चाकणकर म्हणाल्या, “आक्षेपार्ह…”
रुपाली चाकणकर म्हणाल्या पोलिसांच्या दामिनी स्क्वाडने मुलींना सुरक्षा पुरवण्यासह त्यांच्याशी चर्चाही केली पाहिजे. महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत महिला आयोगाने महाराष्ट्रातल्या २८ जिल्ह्यांमधल्या जवळपास १८ हजार तक्रारींचा निपटारा केला आहे. सोमवारी आम्हाला लातूर जिल्ह्यात ९३ तक्रारी मिळाल्या त्यानंतर आम्ही त्या तक्रारी सोडवण्याच्या त्या दिशेने काम करतो आहोत असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.