बुलडाण्यातील खामगाव शहरात रावण टेकडी घरकूल परिसरात आज (२५ डिसेंबर) अंगावर शहारे आणणारी घटना घडली. पतंग उडवत असताना गच्चीवरुन खाली पडल्याने एका १३ वर्षीय मुलाच्या पोटात लोखंडी सळई आरपार घुसली. या घटनेने उपस्थितांच्या अंगावर काटा उभा राहिला. घटनेनंतर मुलाला तात्काळ उपचारासाठी अकोला येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या मुलाची प्रकृती गंभीर आहे.
खामगाव शहरातील रावण टेकडी भागातील घरकूल परिसरातील रुद्र राजेंद्र लुलेकर हा आपल्या मित्रांसोबत शनिवारी (२५ डिसेंबर) एका घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता. यावेळी पतंगाच्या नादात त्याचा तोल गेल्याने तो गच्चीवरून खाली पडला. यावेळी खाली अर्थिंगसाठी जमिनीत रोवलेली लोखंडी सळई त्याच्या पोटात आरपार घुसली.
” पतंग उडवताना घडलेली घटना पालकांची चिंता वाढविणारी”
यावेळी आसपासच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत सळई कापून रुद्रला सळई सोबतच सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याच्या पोटातील सळई काढण्यासाठी व पुढील उपचारासाठी त्याला अकोला रूग्णालयात पाठवण्यात आलं. वृत्त लिहूपर्यंत त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पतंग उडवताना घडलेली ही घटना खरोखर पालकांची चिंता वाढविणारी आहे.
हेही वाचा : Video : भरधाव वेगातील मोटारीने तिघांना चिरडले; ७ वर्षीय मुलाचा मृत्यू, १०० सीसीटीव्ही तपासून आरोपीचा छडा
मकरसंक्रांतीचा सण जवळ आला आहे. शहरात पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. लहान मुलं बेभान होऊन पतंगामागे पळतात. घराच्या छतावर, भिंतीवर चढतात. अशी पतंगबाजी धोकादायक असून पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पतंग उडवण्यासाठी मुलांना उंच गच्चीवर जावू देवू नये. अडचणीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखावे, मोकळया जागेवर उभे राहून पतंग उडविण्यास सांगणं आवश्यक आहे. पालकांनी ही दक्षता न घेतल्यास अशा दुर्घटना घडण्याचा धोका आहे.