औरंगाबाद शहरातील वेगवेगळ्या सिग्नलवर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, ओव्हरब्रीजखाली वास्तव्य करून भीक मागणाऱ्या अल्पवयीन मुलांना भीक मागण्यापासून परावृत्त करणे, तसेच त्यांचे चांगले पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने १८ वर्षांखालील १७ मुला-मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या सर्वाची शहरातील वेगवेगळ्या बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. बालदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस आयुक्तालयातर्फे राबविलेली ही मोहीम यापुढेही वेळोवेळी सुरू ठेवणार असल्याचे पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले.
शहराच्या प्रामुख्याने गजबजलेल्या भागात ही मोहीम हाती घेतली होती. निरालाबाजार, गुलमंडी, औरंगपुरा, बसस्थानक, रेल्वेस्थानक, पैठणगेट, सेव्हन हिल, कॅनॉट गार्डन, सिडको बसस्थानक या भागात गुरुवारी दिवसभर ही मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत १० मुले व ७ मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांचे सुयोग्य पुनर्वसन व संगोपन करण्यासाठी बालकल्याण समितीचे अध्यक्ष यांच्या आदेशाने त्यांना शहरातील वेगवेगळ्या बालसुधार गृहांमध्ये ठेवण्यात आले.
पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, सहायक आयुक्त (गुन्हे) बाबाराव मुसळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाच्या सहायक निरीक्षक सुनीता मिसाळ, गुन्हे शाखेमधील बालकांच्या मदतीला असलेल्या पथकातील हवालदार भीमराव आरके, बाल संरक्षण कक्षाचे जे. पी. घुले, सामाजिक कार्यकर्ते कमलेश चांदणे, बिपीन वाकेकर, मोहसीन खान, नितीन पगारे, मिलिंद टिकेकर आदींच्या मदतीने ही मोहीम राबविण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा