बालरंगभूमी चळवळ उभी करून बाल कलाकारांच्या गुणांना वाव मिळायला हवा यासाठी गेली दहा वर्षे सातत्याने बालअभिनय प्रशिक्षण दिले जात आहे, असे विनोदी अभिनेत्री पद्मश्री नयना आपटे यांनी सांगून आपण बालरंगभूमी जिवंत ठेवण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
येथील राणी पार्वतीदेवी हायस्कूलच्या नवरंग मंचावर माता अनुसया प्रॉडक्शन आयोजित बालनाटय़ चळवळीतील ‘माय फ्रेंड डोरेमॉन’, ‘ढोलकपूरचा छोटा भीम’, ‘मला आई बाबा हवेत’ या बालनाटय़ प्रसंगी बोलत होत्या.
सावंतवाडीतील बालनाटय़ अभिनय प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र व ट्रॉफी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, पद्मश्री नयना आपटे, निर्माता, लेखक, दिग्दर्शक प्रवीणकुमार भारदे उपस्थित होते.
गेल्या पंधरा वर्षांपासून बालनाटय़ अभिनयाचे धडे छोटय़ा मुलांना प्रवीणकुमार भारदे देत आहेत. त्यांच्या बालरंगभूमी चळवळीला दहा वर्षे साथ देत आहेत. मी एक कलाकार आहे. बालरंगभूमीमुळेच मी मोठी झाले हे विसरली नाही. त्यामुळेच मागे वळून बालनाटय़ अभिनयाचे प्रशिक्षण देत आहे, असे नयना आपटे म्हणाल्या.
या लहान वयातच नाटक, थिएटर मुलांना माहिती व्हायला हवे. त्या प्रकारचे वळण मुलांना लावण्यात आले आहे. सिंधुदुर्गात बालनाटय़ महोत्सवातून ९ प्रयोग केले. त्यात जिल्ह्य़ातीलच विद्यार्थी होते. त्यांच्या कलागुणांना त्यामुळेच निश्चितच वाव मिळेल, असा विश्वास अभिनेत्री नयना आपटे यांनी व्यक्त केला. मागील १५ वर्षे प्रवीणकुमार भारदे मुलांना अभिनय कलाशिक्षण देत आहेत. त्यांनी स्वबळावर संस्था उभारून चालविली आहे. त्यांच्या या उपक्रमाला माझी सदैव साथ राहील, असा विश्वास अभिनेत्री आपटे यांनी व्यक्त केला.
यावेळी नगराध्यक्ष बबन साळगांवकर म्हणाले, सावंतवाडी ही कलाकारांची खाण आहे. या शहराने उच्च दर्जाचे कलाकार घडविले. बालकलाकार घडविण्याची ही चळवळ कौतुकास्पद आहे. लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार होत असल्याने ही मुले निश्चितच चमकतील. माता अनुसया प्रॉडक्शनच्या माध्यमातून प्रवीणकुमार भारदे आणि नयना आपटे यांनी शहरात बालअभिनय चळवळीला साथ दिली आहे. त्याचे कौतुक साळगांवकर यांनी केले.
यावेळी अभिनेता, दिग्दर्शक, लेखक प्रवीणकुमार भारदे म्हणाले, आपण राज्यभरात छोटय़ा मुलांना रंगभूमीचे धडे देत आहोत. माझा हा व्यवसाय नाही तसेच शासनाकडून अनुदान लाटण्याचा प्रयत्नही नाही. शासनाची आर्थिक मदत नसतानादेखील सुमारे २४०० प्रयोग छोटय़ा मुलांना घेऊन केले. गेल्या दहा दिवसात सिंधुदुर्गात बालनाटय़ महोत्सवाद्वारे नऊ बालनाटके सादर केली आहेत असे भारदे म्हणाले.
विनोदी अभिनेत्री नयना आपटे आज ६७व्या वर्षांतही बालरंगभूमी चालवीत ठसा उमटवत आहेत. त्यांचा अभिनय सर्वच प्रांतात असूनही छोटय़ा मुलांना कलाकार बनविण्यासाठी त्यांचे मिळणारे सहकार्य कौतुकास्पद असल्याचे प्रवीणकुमार भारदे म्हणाले.
सावंतवाडी, वेंगुर्ले व माणगाव अशा तीन ठिकाणी बालनाटय़ महोत्सवातील ‘माय फ्रेंड डोरेमॉन’, ‘ढोलकपूरचा छोटा भीम’ व ‘मला आई बाबा हवेत’ बालनाटके सादर करणारे बाल कलाकार अवनीश लोंढे, तेजस चव्हाण, खुशी वारंग, ऋतुजा नाईक, अथर्व पित्रे, भावेश सांगेलकर, पार्थ पाटील, विवेक गवस, जुही बांदेकर, गोरक्ष पेठे, मोक्ष रामका, श्रीया दळवी, प्रथम दळवी, फिलिक्स फर्नाडीस, पूनम राऊत, भूमी भिसे, धनश्री चव्हाण, नील भिसे, आयुष तावडे, वरदा सावंत, खुशी शिरसाट, कोयल रामका, सुकन्या नार्वेकर, सार्थक वाटवे, आर्या जाधव, ऐश्वर्यानंद सावंत, दिव्या दळवी, आदित्य खानवीलकर आदी बालकलाकारांचा समावेश होता.
या प्रयोगासाठी दिग्दर्शन सायना प्रशांत शेटे, उमेश सावंत तर सूत्रधार म्हणून ऋषीकेश डोखळे यांनी साथ दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा