सोलापूर : सोलापूरचे थोर मानवतावादी सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांनी दुसऱ्या महायुद्धात जपानी आक्रमणावेळी चीनमध्ये येऊन केलेल्या लष्करी रुग्णसेवेचा आणि केलेल्या त्यागाचा चीन देशाला अभिमान वाटतो. चिनी जनता सदैव डॉ. कोटणीस यांच्या ऋणात राहील असे भावोद्गार चीनचे राजदूत एच.ई. झू फेहाँग यांनी काढले.
सोलापूर शहरातील डॉ.द्वारकानाथ कोटणीस स्मारकाला चिनी राजदुतासह शिष्टमंडळाने भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत मुंबईतील चिनी महावाणिज्य दूत कॉंग झिंयान हुआ यांच्यासह शिष्टमंडळ आले होते. महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्वागत केले त्यानंतर फेहाँग व कॉंग झिंयान हुआ यांनी डॉ. द्वारकानाथ कोटणीस पुतळ्यास यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. यावेळी स्मारकातील वस्तु संग्रहालयातील सर्व छायाचित्रांसह चीनचे जनरल माओ स्ते तुग यांनी महायुध्दानंतर डॉ. कोटणीस यांच्याविषयी कृतज्ञतापर लिहिलेल्या संदेश पत्राचे अवलोकन करण्यात आले. महापालिका लष्कर प्रशालेत चिनी शिष्टमंडळाने भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या शिष्टमंडळाने महापालिकेच्या इंद्रभवन इमारतीलाही भेट दिली.