जगातील कपाशीच्या लागवडीखालील क्षेत्रात ३४ टक्के वाटा भारताचा असताना कापूस उत्पादनात मात्र तो २२ टक्क्यांवर घसरला आहे. चीनने चांगल्या उत्पादकतेच्या बळावर पहिल्या स्थानी मुसंडी मारून भारताला मागे ढकलले आहे. भारताची कापूस उत्पादकता केवळ ४८९ किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे.
‘कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया’च्या ताज्या अहवालानुसार जगात सर्वाधिक ७.४ दशलक्ष टन कापूस उत्पादन घेऊन चीनने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. त्याखालोखाल भारताचे उत्पादन ६ दशलक्ष टन, अमेरिका ३.४ दशलक्ष टन आणि पाकिस्तानमध्ये २.३ दशलक्ष टन उत्पादन झाले आहे. जगाचे उत्पादन २७.४ दशलक्ष टन आहे. भारताला सुरुवातीपासून अल्प उत्पादकतेचा शाप लागला आहे. महाराष्ट्रात कापूस लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक असताना सर्वात कमी उत्पादकता महाराष्ट्राचीच आहे. गुजरातसारख्या राज्यांनी आपली हेक्टरी उत्पादकता मोठय़ा प्रमाणावर वाढवली असताना महाराष्ट्र सातत्याने पिछाडीवर आहे. ‘कॉटन अ‍ॅडव्हायझरी बोर्ड’च्या अंदाजानुसार महाराष्ट्राची २०११-१२ ची कापूस उत्पादकता केवळ ३५३ किलोग्रॅम प्रति हेक्टर आहे. आंध्र प्रदेशची ५०४, तर गुजरातची तब्बल ६४७ किलोग्रॅम आहे. संपूर्ण देशाचे हेक्टरी उत्पादन ४८९ किलोवर स्थिरावल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस उत्पादनाच्या बाबतीत पिछाडीवर राहण्याची पाळी भारतावर आली आहे.
कापसाचे उत्पादन वाढवण्यासाठी आजवर विविध योजना राबवण्यात आल्या आहेत. काही वर्षांपूर्वी इस्रायली तंत्रज्ञानाने कापूस पिकवण्याची सूचना करण्यात आली होती. आता ‘ब्राझील पॅटर्न’चा पुरस्कार केला जात आहे. संकरित वाणांऐवजी स्थानिक वाणांमध्येच बीटी तंत्रज्ञानाचा वापर, फुटवे न होणाऱ्या वाणांची लागवड आणि सघन पद्धतीचा अवलंब ही त्रिसूत्री या पॅटर्नमध्ये आहे. काही वर्षांपूर्वी बीटीयुक्त कापसामुळे उत्पादकता वाढेल, असे सांगण्यात आले होते, पण महाराष्ट्रात सिंचनाच्या अभावामुळे कापूस उत्पादक भागात उत्पादकता वाढू शकली नाही. जगातील काही देशांच्या तुलनेत महाराष्ट्राची आणि भारताची कापूस उत्पादकता अत्यंत अल्प अशी आहे. २०११-१२ या वर्षांत ऑस्ट्रेलियात प्रति हेक्टरी १९९६ किलोग्रॅम कापूस पिकवला गेला. ब्राझीलमध्ये १४६४ किलोग्रॅम, तुर्कस्थानात १३८४ किलोग्रॅम, चीनमध्ये १३३९ किलोग्रॅम उत्पादन घेतले गेले. जगातील ‘टॉप ५’ कापूस उत्पादक देशांमध्ये भारताची गणना होत असली, तरी उत्पादनाच्या बाबतीत मात्र भारत अत्यंत मागास अवस्थेत आहे. टॉप १० मध्येही भारताला स्थान नाही. जगातील उत्पादनातील वाटा केवळ २२ टक्के आहे.
जगातील ६५ देशांमध्ये सुमारे ३६ दशलक्ष हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड केली जाते. भारतात १२.२ दशलक्ष हेक्टर म्हणजे जगातील लागवडीखालील क्षेत्रापैकी ३४ टक्के क्षेत्र भारतात आहे, पण उत्पादन मात्र तुलनात्मकदृष्टय़ा कमी आहे. चीनने मात्र कमी क्षेत्र असूनही उत्पादकता वाढवून प्रथम स्थान पटकावले आहे. जैव तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात कापूस उत्पादकता वाढवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले असले तरी त्याला अद्याप यश मिळालेले नाही. भारतात अजूनही कपाशीचे मोठे क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. कोरडवाहू क्षेत्रातील कापसाची उत्पादकताही कमीच असते, असे सांगितले जात असले तरी काही भागात शेतकऱ्यांनी चांगले पीक घेतले आहे. आंध्र प्रदेशसारख्या राज्याने गेल्या काही वर्षांमध्ये कापूस उत्पादकता चांगल्या प्रमाणात वाढवली आहे. महाराष्ट्र मात्र अजूनही माघारलेलाच आहे.

Story img Loader