डहाणूजवळील पेशवेकालीन बारडगडाचे अस्तित्व प्रकाशात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : तारापूर बंदर, किनारपट्टीवरील किल्ले आणि मराठा-पोर्तुगीज युद्धाच्या पार्श्वभूमीवर शत्रूच्या हालचालींवर देखरेख ठेवण्यासाठी पेशवाईत उभारलेल्या डहाणू तालुक्यातील बारडगडाचे अस्तित्व काही इतिहासप्रेमींनी प्रकाशात आणले आहे. सध्या या गडाचे केवळ भग्नावशेष शिल्लक आहेत.

इराणमधून आलेल्या पारशी समाजाने बोर्डी-अस्वली धरणालगतच्या डोंगरावरील लेण्यांमध्ये अग्नी सुरक्षित ठेवल्याचे पुरावे होते, पण याच परिसरात गड असल्याची माहिती ऐतिहासिक संदर्भासह आता उजेडात आणली गेली आहे. त्या संदर्भातील पुरावे पुण्यातील इतिहास संशोधन संस्थेकडे पाठविण्यात येणार आहेत.

‘चिंचणी हायकर्स’ या गटाने बारडगडाच्या डोंगरावर गडाचे अवशेष असल्याची माहिती २०१७ मध्ये दिल्यानंतर जगदीश धानमेहेर, संजय वर्तक, ध्रुवाली म्हात्रे आणि शैलेश मोरे यांनी विस्मृतीत गेलेला हा गड प्रकाशात यावा म्हणून प्रथम मोहीम हाती घेतली होती. पारशी बांधवांनी अग्नी सुरक्षित ठेवलेल्या लेण्यांचे ठिकाण पाहण्यास काही हौशी पर्यटक मंडळी येत असत, परंतु ‘सह्य़स्पंदन’ या समूहाने चिकाटीने पाहणी मोहीम हाती घेऊन गडाचे अस्तित्व शोधले. तसेच या गडाचे ऐतिहासिक संदर्भ आणि नोंदींचा अभ्यास केला. त्यावरून अवशेषरूपी उरलेला हा गड म्हणजे ‘बारडगड’ असल्याचे अनुमान काढण्यात आले. ज्येष्ठ गिर्यारोहक हमिदा खान यांनी या गडाविषयी २० वर्षांपूर्वी काही माहिती प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या प्रयत्नांना पुढे नेत ‘सह्य़स्पंदन’ने ही माहिती प्रकाशात आणली आहे.

इतिहासप्रेमी जगदीश धानमेहेर, प्रा. दर्शन पागधरे, सिद्धार्थ बाविस्कर, संजय वर्तक, नंदकुमार कारभारी, मकरंद चौधरी आदींनी काही दिवसांपूर्वी या गडाची मोहीम आखली होती. त्यानंतर त्यांनी बारडगडाच्या अस्तित्वाचे पुरावे एकत्रित केले. ते पुण्याच्या इतिहास संशोधन संस्थेकडे देण्यात येणार आहेत.

गड कसा सापडला?

’बारडगडाच्या डोंगरावर गडाचे अवशेष असल्याची माहिती ‘चिंचणी हायकर्स’ गटाने २०१७ मध्ये दिली.

’जगदीश धानमेहेर, संजय वर्तक, ध्रुवाली म्हात्रे आदींनी गडाला प्रकाशात आणण्याची मोहीम राबवली.

’‘सह्य़स्पंदन’ या गटाने पाहणी करून गडाचे अस्तित्व शोधले, त्याच्या ऐतिहासिक नोंदींचा अभ्यास केला.

’त्यावरून अवशेषरूपी उरलेला हा गड म्हणजे ‘बारडगड’ असल्याचे अनुमान काढण्यात आले.

गडाची वैशिष्टय़े

– तलासरी तालुक्यातील सेगवा गडाइतकेच पेशवाईत बांधलेल्या बारडगडाचे क्षेत्रफळ आहे.

– गडावर सातवाहनकालीन खांब आहेत. तलाव, तटबंदी आणि दरवाजांचे भग्नावशेषही आढळतात.

– तारापूर बंदर आणि शूर्पारक (नालासोपारा) बंदरातून उतरविण्यात येणाऱ्या वस्तूंची गुजरातकडे वाहतूक करताना या गडावरून देखरेख ठेवण्यात येत असावी.

– युद्ध परिस्थितीत शत्रूवर देखरेख ठेवण्यासाठीही या गडाचा वापर केला गेला असण्याची शक्यता आहे.

गडावर कसे पोहचाल?

बोर्डी गावाजवळ असलेल्या अस्वली धरणाच्या जवळून या गडावर चढण्यासाठी एक मार्ग आहे. धुंदलवाडी-आंबेसरी-गांगणगाव पाटीलपाडा या मार्गेही या गडावर पोहोचता येते.

बारडगडासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या डोंगरावर भ्रमंती केली. आम्हाला गडाचे भग्नावशेष सापडले होते. मात्र त्याचा ऐतिहासिक संदर्भ शोधण्यास खूप वेळ लागला. संदर्भशोध पूर्ण झाल्यानंतर जाणकारांना घेऊन गेल्या रविवारी पुन्हा एकदा दुर्ग अभ्यास मोहीम केली.

जगदीश धानमेहेर, सह्य़स्पंदन

ऐतिहासिक नोंद

‘‘राजश्री रायाजी शंकर यास कार्य असिलें तर ठेवणें. ते राहातील. जर तुम्ही तेथील कार्यास उपक्रम केलाच नसेल तर मग विनाकार्य मशारनिल्हेस ठेवावेसें नाहीं. पाठऊन देणें. डहाणूजवळ डोंगर बांधावयाचा आहे, तो बांधतील.’’

संदर्भ : मराठय़ांच्या इतिहासाची साधने खंड सहावा, लेखांक १२७, पृष्ठ २३६ – राजवाडे

 

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chinchani hikers group search dahanu baradgad fort zws